राज्य मार्गांवरील जीर्ण वृक्ष तोडण्याची मागणी

0

एरंडोल । राज्य मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले जीर्ण वृक्ष पावसाळ्यापूर्वी तोडण्यात यावे, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. जीर्ण व अर्धवट खराब असलेल्या वृक्षांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य मार्गांसह काही प्रमुख रस्त्यावर अनेक वृक्ष जीर्ण झाले असून रस्त्यांवर अर्धे वाकले आहेत. पावसाळ्यात जीर्ण वृक्षांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. अनेक वृक्ष बुंध्यापासून पोकळ झालेले असल्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.तर काही वृक्ष पूर्णपणे वाळले आहेत. तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजूस काटेरी झुडपे वाढली असल्यामुळे वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

काटेरी झुडूपामुळे अनेक दुचाकी चालकांना दुखापत झाली आहे. ग्रामीण भागात खुलेआमपणे जिवंत वृक्षांची तोड केली जात आहे मात्र जीर्ण झालेले व संभाव्य होणार्‍या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकणार्‍या वृक्षतोडीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वन खात्याच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल आच्छर्य व्यक्त करण्यात येत आहे.धरणगाव रस्त्यावरील जीर्ण झालेले चिंचेचे झाड पूर्णपणे रस्त्यावरच वाकले असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे चालकांमध्ये वाद होत असतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग व वनखात्याच्या अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेले वृक्ष तोडून वाहन चालक व नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.