ठाणे । महागाई, शेतकरी आत्महत्या, मराठा- धनगर- मुस्लीम आरक्षण आदी सर्वच आघाड्यांवर या सरकारने जनतेची पिळवणूकच केली आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे 4 ते 5 हजार लोक सहभागी झाले होते. तीन वर्षे शांततेत गेली असतानाच आता सर्वच घटकांची पिळवून या सरकारकडून केली जात आहे. त्यामुळेच आता भाजप- सेनेच्या सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना जनता धडा शिकवेल, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
धनगरांच्या तोंडाला पाणी पुसले
यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, जेव्हापासून भाजप सेनेचे सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून येथील सर्व घटक नाराज आहेत. तीन वर्षांत महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोलचे, गॅसचे, भाज्यांचे, अन्नधान्याचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. शेतकर्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. धनगरांना आरक्षण देतो म्हणून सांगितले. बारामतीमध्ये जाऊन आंदोलन केले, तरीही धनगरांच्या तोंडाला पाणी पुसले.
राज्य सरकारने 25 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकर्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यासोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयशच आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे, आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात हा मोर्चा काढण्यात आला. गडकरी रंगायतनपासून सुरु झालेला हा मोर्चा मासुंदा तलावाला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या फेरीवाले, पोतराजांनी आत्मक्लेश करुन सरकारचा निषेध केला तसेच या मोर्चात हातगाडीवर भाज्या ठेवून महागाईचाही निषेध करण्यात आला.
मोर्चात यांची होती उपस्थिती
या मोर्चात नगरसेविका राधाबाई जाधवर, सुहास देसाई, वहिदा खान, दिगंबर ठाकूर, अंकिता शिंदे, वनिता घोगरे, प्रकाश बर्डे, मुकुंद केणी, शानू पठाण,अपर्णा साळवी, वर्षा मोरे, महेश साळवी, आरती गायकवाड, अश्रफ (शानू) पठाण, राजन किणे, अनिता किणे, मोरेश्व र किणे, जोफर नोमानी, सुनीता सातपुते, साकीब दाते, चंदन गोटे, रेहान पितलवाला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा करिना दयालानी, युवक अध्यक्ष मंदार किणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष अभिजीत पवार, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, दी भाषिक सेलचे ठाणे अध्यक्ष प्रभाकर सिंग, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, कार्याध्यक्ष रमेश दोडके , ओबीसी सेलचे राजापूरकर, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रांतवाद देशाच्या एकतेला बाधक
जीएसटीमुळे छोटे व्यावसायिकही मारले गेले आहेत. एकंदरच भाजप – शिवसेनेने समाजातील सर्वच घटकांना मारुन टाकले आहे. या पापाचा घडा भरल्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वच जिह्यांमध्ये हा हल्लाबोल मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्तानेच ठाण्यातही हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. जनताच सरकारला आता चांगलाच धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी आमदार आव्हाड यांनी दिला. या मोर्चात फेरीवालेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबाबत विचारले असता, या महाराष्ट्रात प्रांतवाद- जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी फेरीवाले चुकीचे वागतही आहेत. पण, त्यातून प्रातंवाद निर्माण केला जात आहे. हा प्रांतवाद देशाच्या एकतेला बाधक ठरणार आहे.