राज्य सरकारकडून विकास आराखड्यात फेरबदल

0

पिंपरी-चिंचवड : ताथवडे गावाच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने विकास आराखड्यातील काही भाग वगळला आहे. विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. हे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. त्यावर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास 30 दिवसांच्या मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील सामाजिक, मूलभूत सुविधांच्या वापरासाठी एकूण 937 पैकी 850 आरक्षणे कायम ठेवली आहेत. सरकारी जागांवरील 87 आरक्षणे उठविण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने डीपी मंजूर करताना 10 टक्क्यांपेक्षा जास्त बदल केले आहेत.

ताथवडेच्या प्रारूप विकास योजनेस मंजुरी
महापालिका हद्दीतील ताथवडे गावाच्या प्रारूप विकास योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने क्रमांक 1 ते 28 हा भाग मंजुरीतून वगळला. या नियोजित फेरबदलासंदर्भात 6 जानेवारी 2017 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. या फेरबदलासंदर्भात नागरिकांकडून मुदतीत प्राप्त होणार्‍या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यासाठी पुणे विभाग नगररचना सहसंचालक अविनाश पाटील यांची नियुक्ती केली आहे.

सूचना आणि हरकतींसाठी महिन्याची मुदत
ताथवडे गावाच्या प्रारूप विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. ते नागरिकांसाठी 30 मार्चपासून पुणे विभाग नगररचना कार्यालयात, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच महापालिकेच्या विकास योजना विभागात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी 30 दिवसांच्या विहीत मुदतीत हरकती किंवा सूचना सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.