राज्य सरकारच्या निषेधार्थ मंत्रालयाचे नामांतर मेंढरालय

0

अहमदनगर – पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करण्यास राज्यसरकारची इच्छाशक्ती नसल्याने मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.३० जून रोजी स्टेट बँक चौकामध्ये घरकुल वंचित उघड्यावरचा संसार थाटून, पुणे, औरंगाबाद, व सोलापूर महामार्गावर रास्तारोको करणार आहे. तसेच महाराष्ट्र मंत्रालयाचे नामांतर मेंढरालय करणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

राज्याच्या ५१ शहरात प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यात आली. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एक आर जमीन सुध्दा शासनाकडून महापालिकेला देण्यात आलेली नाही. शहरालगत मोठ्या प्रमाणात सरकारी जागा पडून आहे. लॅण्ड बँक स्थापन करुन सरकारी जागा घरकुल वंचितांना उपलब्ध करुन दिल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न मिटणार आहे. संघटनेने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करण्याची मागणी केलेली आहे.

तसेच राज्यात मोठ्या संख्येने घरकुल वंचितांची घरे सरकारी जागेवर आहे. ही घरकुल वंचितांची अतिक्रमणे नियमित करण्याची संघटनेची आग्रही मागणी असताना, संघटनेच्या वतीने ७२ आंदोलने करण्यात आली. मात्र शासन घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्या वेदना शासनाच्या निदर्शनास आनून देण्यासाठी घरकुल वंचित उघड्यावरचा संसार थाटणार आहे तर सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र मंत्रालयाचे नामांतर मेंढरालय करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करावा, लॅण्ड बँक स्थापन व्हावी. सरकारी जागेवरील घरकुल वंचितांचे अतिक्रमण नियमाकुल करावे. घरकुल वंचितांना अडीच लाख अनुदान ऐवजी भुमीगुंठा उपलब्ध करुन देण्याची संघटनेची मागणी आहे. सदर आंदोलनाच्या इशार्‍याचे व मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालय, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.