राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘मधुमक्षिका मित्र’ उपक्रम

0

पुणे :- मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असलेला असा कीटक आहे. त्यामुळे मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिका पालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी आज केली. पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था, संशोधन, प्रशिक्षण विभाग यांच्या वतीने कार्यक्रमात ते बोलत होते.

२० मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून नुकताच संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आला आहे. त्या निमित्ताने मंडळाच्या वतीने पुण्यातील हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात पहिल्या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय मधुमक्षिकापालन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन आज चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकारच्या पुढाकाराने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. या अंतर्गत प्राणीमित्र, सर्पमित्र यांसारखेच मधुमक्षिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी लवकरच कॉल सेंटरचे उभारणी करण्यात येईल, असेही चोरडिया म्हणाले.

यांची होती उपस्थिती
सीबीआयआरटी अर्थात केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग आदी यावेळी उपस्थित होते.