नागपूर : शेतकर्यांचे प्रश्न भाजपा सरकारला बिलकुल समजत नाहीत. निवडणुकीपूर्वी शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणार्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला. शेतकर्यांच्या पीक विम्याची रक्कम कापून घ्या, असा अध्यादेश सरकारने नुकताच काढला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजप-शिवसेनेचे हे सरकार आता फार काळ टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल, असा टळटळाट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे सरकारला दिला. शेतकर्यांचे कर्जमाफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या पक्षांनी संयुक्तपणे चांदा (चंद्रपूर) ते बांदा (पनवेल) पर्यंत संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. चंद्रपूरपासून सुरु झालेली ही संघर्ष यात्रा गुरुवारी दुपारी 1 वाजता बुटीबोरी येथे पोहोचली. बुटीबोरी चौकात जाहीर सभा पार पडली, या सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण बोलत होते.
महाराष्ट्रातील नव्या समीकरणाचे संकेत
संघर्ष यात्रेत सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते आ. अबू आजमी, शेकापचे आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, मधुकर चव्हाण, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. खा. अशोक चव्हाण म्हणाले, गरीब सामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार असते. परंतु श्रीमंतांच्या भाजप सरकारने सामान्यांना निराशाच दिली. भाजपच्या काळात गेल्या दोन वर्षात 9 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केली. ती अजुनही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा काढली आहे. शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा आहे. तेव्हा तुम्ही (शेतकर्यांनी) आम्हाला हिम्मत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत. शेतकर्यांच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम. युनायडेट जनता दल यासारखे विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही आगामी महाराष्ट्रातील नव्या समीकरणाचे संकेत आहेत, असेही खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मन की बात खूप झाली; कर्जमाफीचे बोला!
राज्यातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. विधिमंडळात कर्जमाफीची मागणी केली म्हणून विरोधी पक्षातील 19 आमदारांना निलंबित करण्यात आले. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणे हा गुन्हा ठरत असेल तर हा गुन्हा आम्ही यापुढेही करू. भाजपा नेत्यांनी मन की बात बंद करून कर्जमाफीची घोषणा करावी. शेतकरी आणि कष्टकर्यांना न्याय मिळावा. यासाठीच संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सिंदेवाही ते पनवेल अशी निघालेली संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथे आयोजित जाहीर सभेत विखे पाटील बोलत होते. आता कोणत्याही निवडणुका नसल्याने राजकीय हेतूने ही संघर्ष यात्रा काढलेली नाही. शेतीमालाला भाव मिळावा, शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी. यासाठी ही संघर्ष यात्रा असल्याचे विखे पाटील म्हणाले.
व्यापार्यांचे कर्ज माफ, मग शेतकर्यांचे का नाही : अबू आजमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक खोटारटे व्यक्ती आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आजमी यांनी केली. सर्वप्रथम प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील असे आश्वासन दिले. ते अजुन पाळले नाही. मोठ्या व्यापार्यांचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकर्यांचे कर्ज का माफ केले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकर्यांचे प्रश्न मांडले म्हणून 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले. तेव्हा या सरकारला अद्दल घडवा, असे आवाहनही अबू आजमी यांनी केले.