मुंबई । राज्य सहकारी अधिकोषातील 1500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी येत्या 6 महिन्यांत निवृत्त न्यायाधिशांद्वारे करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 31 मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिली. राज्य सहकारी बँकेमधील गैरव्यवहाराची चौकशी 30 महिने होऊनही पूर्ण न झाल्याबद्दल सदस्य जयप्रकाश मुंदडा, व इतर सदस्यांनी प्रश्न विचारला होता. सुरेश हाळवणकर, प्रकाश अबिटकर, अधिवक्ता आशीष शेलार, अनिल गोटे अशा अनेक सदस्यांनी चौकशीला विलंब लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना धारेवर धरले. या घोटाळा प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी सदस्यांनी मागणी केली.
हस्तक्षेप न होण्याची मागणी
जयप्रकाश मुंदडा उपप्रश्न विचारताना म्हणाले , राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणाची चौकशी करणार्या अधिकार्यांवर दबाव टाकला जात आहे. राजकीय हस्तक्षेप होत असल्याने गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होत नाही. या प्रकरणात कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप होऊ नये, अशी मागणी केली. सुरेश हाळवणकर यांनी राज्य सहकारी बँकेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी लूट केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. . प्रकाश अबिटकर म्हणाले, राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत ज्यांनी चोरी केलेली आहे, ज्यांची चौकशी चालू आहे, असे लोक पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे सहकार खात्याने चुकीचे काम करणार्यांवर तात्काळ कारवाई करावी.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या चौकशीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मुदतीत चौकशी पूर्ण झालेली नाही. राज्य सहकारी बँक चौकशीसाठी मुदतवाढीकरिता विधेयक पारित केलेले आहे. चौकशीला मुदतवाढ मिळण्याविषयीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडूनही शासनास प्राप्त झाला असून तो शासनाच्या विचाराधीन आहे.