राज्य स्तरावर सलग सात वेळा चमकदार कामगिरी
रावेर- 71 वी पुरुष व 34 वी महिला राज्यस्तरीय सिनिअर वेट लिफ्टिंग स्पर्धा 27 ते 28 डिसेंबरदरम्यान औरंगाबाद येथे झाल्या. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत जळगाव जिल्हा वेट लिफ्टिंग संघटनेच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून उपविजेतेपद पटकाविले. राज्य पातळीवर अशी सलग सातवेळा कामगिरी करून जिल्हा संघटनेचे व रावेर शहराचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे.
पुण्याच्या स्पर्धेत लागणार वर्णी
स्पर्धेत 61 किलो गटात भोलानाथ चौधरी, 81 किलो गटात मनीष महाजन यांनी सिल्व्हर पदक पटकाविले तर पुणे येथे होणार्या दुसर्या खेलो इंडिया खेलो स्पर्धेकरीता अभिषेक महाजन गोविंदा महाजन, दुर्गेश महाजन, किरण मराठे या खेळाडूंची निवडीची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांपासून जिल्हा संघटनेच्या खेळाडूंच्या कामगिरीत उच्च कोटींची सुधारणा होत असून 2018 या वर्षात रावेरच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर तब्बल 38 पदके पटकाविली आहेत. युवा खेळाडू अभिषेक महाजन, दुर्गेश महाजन यांच्याकडून भविष्यात आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई होईल, अशी खात्री आहे. वेट लिफ्टर खेळाडू हे दररोज सुमारे तीन तास श्री व्ही.एस.नाईक महाविद्यालयाच्या जिमखान्यात वेट लिफ्टिंग प्रशिक्षक अजय महाजन, नितीन महाजन, संदीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परीश्रम घेतात.
खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव
विजयी खेळाडूंच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा वेट लिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुजूमदार, कार्याध्यक्ष प्रदीप मिसर, सचिव व राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, प्रकाश बेलस्कर, आमोद महाजन, यशवंत महाजन तसेच व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.