मुंबई- कामगार, समाजवादी नेते माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.
'सम्राट' कायमचा 'बंद' झाला . #GeorgeFernandes pic.twitter.com/7JHJdRJfPn
— Raj Thackeray (@RajThackeray) January 29, 2019
जॉर्ज फर्नांडिस यांचे आज मंगळवारी सकाळी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. राज ठाकरे यांनी दुपारी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.
फर्नांडिस म्हणजे बंद हे जणू समीकरणच झाले होते. अनेक कामगार संघटांनाचे नेतृत्व करताना फर्नांडिस यांनी कामागारांच्या मागण्यांसाठी बंदचे शस्त्र वापरले. त्यांची ओळख ‘जॉर्ज फर्नांडिस: बंदसम्राट’ अशी तयार झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७० च्या दशकामध्ये अनेकदा मुंबईमधील संघटित कामगारांनी बंदची हाक दिली आणि ती यशस्वी करुन दाखवली. फर्नांडिस यांनी वाहतूक संघटनांना त्याच्या मागण्यांसाठी बंद हा प्रभावी पर्याय असल्याची जाणीव करुन दिली. त्याच्या या बंदच्या हाकेला नंतर बेस्ट संघटना, रेल्वे तसेच टॅक्सी युनियन्सही आपलेसे केले. त्यामुळे जर सार्वजनिक प्रवासाची माध्यमेच बंदमध्ये सहभागी झाली तर तो बंद यशस्वी होतोच. जवळजवळ दोन दशके फर्नांडिस यांनी अशाप्रकारे बंदच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सामान्य मुंबईकरांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवले.