मुंबई । काँग्रेस ऑफिस फोडल्याप्रकरणी अटक झालेल्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज रविवारी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांची चौकशी करत केलेल्या कामाबद्दल कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप दिली. तसेच दुकानांच्या मराठी पाट्यांच्या आग्रहासाठी पुन्हा आक्रमक होण्याचे आदेश त्यांनी दिले. यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी जानेवारीपासून राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे घोषित केले. या निमित्ताने पक्ष बांधणी अणि पक्ष संघटनांचे काम राज करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चाही केली. सध्या मराठी भाषा आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे पक्ष पुन्हा सक्रीय होत आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रातही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे काम या दौर्यातून करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्याचा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी धरायला सुरुवात केली. विक्रोळीत असाच आग्रह धरण्यासाठी दुकानदारांकडे गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मारहाण केली, त्याचा बदला म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर शांत झालेले मराठी पाटीचे आंदोलन आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.