मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ सभा देखील घेणार आहे. संपूर्ण महराष्ट्रात ते ६ सभा घेणार आहेत असे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांची अवस्था दुर्दैवी आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत गेलेली मंडळी मनाने हिंदुत्त्ववादी आहेत. त्यामुळे त्यांचा उरलासुरला मतदारही त्यांना सोडून देणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांची सध्याची अवस्था ‘मान ना मान मै तेरा मेहमान’ अशी झाली आहे या अवस्थेचे मला दुर्दैव वाटते असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत असलेले अनेकजण मनाने शिवसेना आणि भाजपाचे मतदार आहेत. त्यावेळेस राज ठाकरे हे एक मोठं नेतृत्त्व होईल असं वाटल्याने हे लोक त्यांच्यासोबत गेले. फार राहिले नाही, राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरीही त्यांचा मतदार, म्हणजेच मनसेचा जो काही उरलासुरला मतदार असेल हा मतदार त्यांच्यापासून तुटेल. राज ठाकरे जेवढ्या ताकदीने भाजपा आणि सेनेविरोधात बोलतील तेवढ्या ताकदीने त्यांचा मतदार भाजपा सेनेकडे वळेल असे मला वाटते असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.