जनतेने रोजगारमुक्त केल्याच्या मानसिकतेतून राज यांची मुक्ताफळे; भाजपची टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली मोदीमुक्त भारताची घोषणा भाजपच्या जिव्हारी लागली आहे. ज्यांना राज्यातील जनतेने रोजगारमुक्त केले त्यांनी मोदीमुक्त भारताची मुक्ताफळे उधळू नयेत. मोदीमुक्त भारत जरा जास्तच झाले. राज यांनी त्यांचा स्तर पाहून बोलावे, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली आहे.
राज ठाकरेंवर आता पवारांचा प्रभाव
2019 साली भारताला तिसर्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा, असे आवाहन राज यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत रविवारी केले होते. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून धार्मिक दंगल घडविण्याचा भाजपचा डाव आहे, असाही आरोप राज यांनी केला होता. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून, त्यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना आशीष शेलार म्हणाले, पूर्वी राज यांच्या भाषणावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव दिसायचा, आता त्यांच्यावर शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो. 2014 च्या निवडणुकीत विधानसभा मनसेमुक्त झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा टोलाही शेलार यांनी लगाविला.
यांच्याकडे नेते तरी आहेत का?
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राज यांच्यावर तोंडसूख घेतले. पराभूत मानसिकतेतून राज यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मोदीमुक्त भारत करण्याआधीच महाराष्ट्राने त्यांना मनसेमुक्त केल्याची टीका भातखळकर यांनी केली. ज्यांनी यांचे नगरसेवक पळविले, त्यांच्यावर टीका केली नाही आणि मोदीमुक्त भारताची मुक्ताफळे उधळली जात आहेत. मोदीमुक्त भारत करण्यासाठी यांच्याकडे नेते तरी आहेत का? असा सवालही त्यांनी केला.