राज ठाकरेंची नरमाईची भूमिका युतीवर विचार

0

मुंबई : गेल्या नऊ वर्षांत झालेल्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाशी युती न करणारे आणि युतीला टाळीसाठी हात पुढे आल्यानंतरही तो झिडकारणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आता युतीबाबत अनुकूलतेने विचार करत आहेत. एखाद्या पक्षाने युतीबाबत विचारणा केल्यास त्यावर नक्की विचार करू, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, भाजपकडूनही युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे बोलले जात असून, युतीबाबतचा पेच सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय निवडणुकांच्या आधी घ्या, असे आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला केले आहे. करणार

उद्धव ठाकरेंचा भाजपला अल्टिमेटम!
राज्य सरकारमध्ये मानापमानावरून एकमेकांविरोधात ‘टीकासूर’ लावणार्‍या सत्ताधारी भाजप-शिवसेना यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीत युती होईल की नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. असे असतानाच युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक होण्याआधी युतीचा निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपकडूनही युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे बोलले जाते. पुढील दोन दिवसांत महापालिका निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर युतीबाबतचा निर्णय घ्यावा, असे सांगून ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत युतीसाठी पहिली ‘टाळी’ कोण देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.