राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा भाजपवर तीर

0

मुंबई । राज ठाकरे यांच्या कुंचल्याचे फटकारे अजूनही भाजपवर फटकारे मारण्याची संधी सोडत नाहीत. पुन्हा त्यांनी एक अनोखे व्यंगचित्र साकारत भाजपवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश केला. तामीळनाडूत कलाकारांनी राजकारणात येण्याची परंपराच आहे. मात्र, याच प्रवेशावर टीका करत राज ठाकरे यांनी भाजपलाही लक्ष्य केले आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर भाजपने राजकारणातील दोन गटांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. परंतु, कमल हसन यांची लोकप्रियता भाजपला त्रासदायक ठरू शकते, हा चित्राचा मतितार्थ आहे.

‘तामीळनाडूच्या तलावात हे कमल अचानक कुठून उगवले’
तामीळनाडू नावाचा एक तलाव दाखवण्यात आला आहे. या तलावात एक भलेमोठे कमळ उगवले आहे. या कमळाच्या पानांवर ‘कमल’ असे लिहिण्यात आले आहे, तर कमळाच्या पाकळ्यांवर तामीळ अस्मिता असे लिहिण्यात आले आहे. या भल्या मोठ्या कमळाच्या मध्यभागी अभिनेता कमल हसन उभा आहे, तर तलावात एक छोटे कमळही आहे. ते कमळ भाजपाचे आहे असे दाखवण्यात आले आहे. तलावाच्या किनार्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उभे आहेत. साहेब, हे अचानक कुठून उगवले आता? असे अमित शहा नरेंद्र मोदींना विचारत असल्याचे रेखाटण्यात आले आहे.