मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभेतून भाजपला चांगलेच फटकारत आहे. काल मुंबईत झालेल्या सभेत ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या कुटुंबीयांचे छायाचित्र दाखवत चांगलीच पोलखोल केली. त्यानंतर जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या कुटुंबाला थेट मंचावर आणले. राज ठाकरेंच्या या पोलखोलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीरात असणारी फेसबुक पोस्ट गायब झाली आहे. मोदी फॉर न्यू इंडिया या फेसबुक पेजवर असणारी संबंधित जाहीरात हटवण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानातील सभेमध्ये ‘मोदी है तो मुमकिन है’ या जाहीरातीची पोलखोल केली. या जाहीरातीमध्ये मोदींसोबत एका कुटुंबाचा फोटो दाखवला होता. या संपूर्ण कुटुंबालाच राज ठाकरे यांनी मंचावर आणले व भाजपाच्या जाहीरातीचे पितळ उघडे पाडले. या कुटुंबाने भाजपाच्या जाहीरातीत काम केले नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. भाजपाच्या आयटी सेलवाल्यांनी हा फोटो क्रॉप करुन मोदींच्या फोटोसोबत जोडला व ‘मोदी है तो मुमकिन है’ जाहिरातीसाठी वापरला. हे फक्त एक उदहारण आहे. अशा कितीतरी अजून अशा गोष्टी असतील. भाजपाच्या आयटी सेलकडून खोटया बातम्या पेरल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.