राज ठाकरे – प्रसिद्ध सर्जन डॉ. बोरुडे बनले व्याही-व्याही!

0

मुंबई : बहिणीची मैत्रिण ते वाग्ददत्त वधू असा अमित राज ठाकरे याच्या प्रेमप्रकरणाचा शेवट अखेर सोमवारी राज व शर्मिला वहिनी यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी गोड झाला. अमित याचा त्याची मैत्रिण मिताली बोरुडे हिच्यासोबत छोटेखानी समारंभात साखरपुडा पार पडला. मिताली ही प्रसिद्ध बॅरिअ‍ॅट्रीक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या आहे. या नव्या नात्याने डॉ. बोरुडे व राज ठाकरे हे व्याही-व्याही झाले आहेत. या सोहळ्यास ठाकरे व बोरुडे परिवारातील 60 ते 70 नातेवाईकच उपस्थित होते. त्यात मनसेनेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि राजन शिरोडकर यांचा समावेश होता. अमितचे काका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चुलतभाऊ आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र प्रत्येकाला खटकली होती. तथापि, स्मिता ठाकरे व त्यांचे पुत्र राहुल ठाकरे हे मात्र या सोहळ्यास आवर्जुन उपस्थित होते.

दीर्घ कालावधीनंतर ठाकरे घराण्यात वाजणार सनईचौघडा
अमित-मिताली हे बालपणीचे मित्र असून, मागील पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. अमित पोद्दार महाविद्यालयाचा, तर मिताली रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित वाणिज्य पदवीधर असून, त्याने व्यवस्थापनाचेही शिक्षण घेतले आहे, तर मिताली फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अमितकडे नव्या वर्षांत पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. साधारण मार्च महिन्यात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवले जाणार असल्याचे सांगण्यात येते. हा साखरपुडा सोहळा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. सोमवारी राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अमितच्या निमित्ताने ठाकरे घराण्यात बर्‍याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार आहे.