मुंबई । शिवसेनेचेने कट्टर विरोधक असलेल्या राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या घरासमोर फेरीवाले बसवले जाणार आहेत. मात्र, त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर नो हॉकर्स झोन असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हे सारे ठरवून केले गेले असावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केले गेले असून, 31 जानेवारीपर्यंत यावर हरकतीही मागवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासाप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे, अभिनेता आमीर खान, संजय दत्त यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर 100, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर 310 फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून 1366 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्तावित करण्यात आले असून त्यावर 85 हजार 891 फेरीवाल्यांच्या जागा देण्याचा विचार आहे. मात्र शाळा, धार्मिक स्थळे, रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही. रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही. राज यांच्या कृष्णकुंजबाहेरील दोन रस्त्यांवर प्रत्येकी 10 असे 20 फेरीवाले प्रस्तावित करण्यात आले आहेत, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंच्या जुहूतील तारा रोड परिसरात घराबाहेर 36 फेरीवाले प्रस्तावित आहेत. या धोरणाचा नीट अभ्यास केला जाईल.