भारतात उठता बसता लोकशाहीचे हक्क उपभोगत लोकशाहीलाच शिव्या घालण्याची फॅशन खूपच बोकाळलेली आहे. त्यात मग अपवाद कोणाचाच नसतो. अगदी लोकशाही व्यवस्थेचे फायदे उकळत सुखाने जगणाऱ्यांपासून मतदानाच्यावेळी गायब राहून नंतर कोणीही सत्तेवर आलं तरी ते कसे अयोग्यच, नालायकच, त्यामुळेच मी मतदान केले नाही असे बेशरमपणे सांगणाऱ्या निर्लज्ज सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनाच ही फॅशन चांगलीच भावते. त्यात पुन्हा आपल्या उस्मानाबादच्या खासदार रवींद्र गायकवाडांसारखे काही नगही असे निवडून आलेले असतात जे जाणीवपूर्वक असे वागतात जे लोकशाहीला नावे ठेवणाऱ्यांना सुवर्णसंधी मिळवून देणारे ठरते.
एक खासदार तोही पेशाने प्राध्यापक राहिलेला. म्हणजेच सुशिक्षित म्हणता येईल असा. आणि त्यांच्याबद्दल बातम्या काय येतात? एअर इंडियाच्या विमानातून येताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने त्यांना योग्य वागणूक दिली नाही या अतिगंभीर कारणामुळे म्हणे त्यांनी त्या कर्मचाऱ्याला २५वेळा चपलेने मारहाण केली. आता पंचवीस हे तुम्ही मोजले का? असे कोणी विचारूही शकत नाही. कारण चप्पलमार म्हणून देशविख्यात झालेल्या माननीय खासदार महोदयांनी तसा दावा केला आहे. पुन्हा ते म्हणाले तसेच. ते काही भाजपवाले नाहीत. त्यामुळे एकदा केलेला दावा जुमला म्हणून ते परत घेणार नाहीत असा विश्वास आहे. आणि त्यांनी तसे केले तरी विमानातील इतर कर्मचारी होतेच की खासदारांचा चपलावतार पाहण्यासाठी!
माननीय खासदार रवींद्र गायकवाड हे राजकारणात येण्यापूर्वी प्राध्यापक होते. पूर्वीच्या पद्धतीने सांगायचे तर चांगले डबल ग्रॅज्युएट आहेत. पण का कोणास ठाऊक शिक्षणाचा आणि उगाच आपल्या वागण्याचा संबंध जोडण्याची गल्लत त्यांनी कधीही केलेली नाही. आडंदाड वागायचे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत नाही का पोलीस उपअधीक्षकांशी गैरवर्तन केले? आता ते गरीब बिचारे पोलीस. त्यांना थोडी युनियन-बिनियन करता येते. त्यात पुन्हा उस्मानाबादचे. काय बोलणार. खासदारांचा आत्मविश्वास त्यातूनच वाढला असावा. पण जागा आणि माणसे चुकली ना राव. यावेळी त्यांनी ज्याला लक्ष्य केले ते युनियनबाज लोक! खासदारांनी चप्पलमारी करताच त्यांनी गाजवलं की त्यांना. त्यात पुन्हा तुम्ही देशाचे रोडमॉडल तुम्हाला हे शोभतं का वगैरेही खूप सुनावलं. तेवढंच नाही. पोलिसांमध्ये खासदारसाहेबांवर गुन्हा धाकल केलाच. विमानातून उड्डाणावरही बंदी आणली!
हे झाले खासदार गायकवाड साहेबांचे. ते गाजत होते तेवढ्यात येथे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत राडा झाला. शिवसेनेच्या आणि भाजप समर्थक अपक्ष अशा दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. तशी ती चौथी घटना. पोलिसांनी राजकारण्यांच्या गाड्या तपासल्या. या हाणामारीवाल्यांकडे हॉकीस्टिक, काठ्यावगैर किरकोळ गोष्टी मिळाल्या. पण काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाची गाडी तपासली तेव्हा बंदूक मिळाली! त्यांचे म्हणणे माझ्याकडे परवाना आहे. पोलीस म्हणतात तो आपल्याकडे चालत नाही. म्हणजे पालिकेत सेना-भाजपवाले राडा करतात आणि काँग्रेसवाले बंदुका आणतात!
हे सारे घडताना पाहून आम्हालाही वाटले लिहावे हे असे लोकप्रतिनिधी लोकशाहीला कसे कलंक आहेत. अशांच्या हाती सुत्रे असल्यामुळे देशाची कशी वाट लागत आहे. कायदे करण्याचा अधिकार ज्यांच्या हाती तेच कसे कायदे हाती घेतात. हे चालले आहे तरी काय. वगैरे. वगैरे. पण बोललो जरा तपासुया. आपलंही काही चुकत तर नाही. नाही तर शेंबुड माझ्या नाकाला आणि मी हसतो लोकांना तसे व्हायचे. तपासू लागलो. ही अशी हाणामारीवाली माणसे लोकप्रतिनिधी बनतात तरी कशी? त्यांचे पक्ष त्यांना थेट वरिष्ठ सभागृहात पाठवतो? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्विकृत वगैरेचे टिळे लावतो की आणखी काय? मात्र क्वचित अपवाद वगळले तर तसे नसते. बहुतेक वेळा आपल्यासारखे मतदारच अशांना निवडून देतात. आता आपले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे पाहा. उच्चशिक्षित. प्राध्यापक. तरीही आडदांडपणे वागतात. का बरे? त्यांचे समर्थक सांगतात. साहेबांना माहीत आहे आमच्या भागात हे आवडते. त्यामुळे ते जाणीवपूर्वक तसे वागतात. तीन वेळा लोकांनी निवडून दिले आहे. तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मसिंह पाटलांसारख्या बाहुबली पैलवानाला चितपट करून! आताही पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वेमार्गे मुंबईस परतताना खासदारसाहेबांच्या छातीत दुखू लागले. ते अज्ञातवासात गेले होते. तेव्हा समर्थक एअर इंडिया कर्मचाऱ्यांविरोधात निदर्शने करत होते.
या खासदारांनी “मी काय भाजपचा आहे का गप्प बसायला?” असे म्हटले अशले तरी त्यांना खोटी गुर्मी आहे. भाजपवाले काय कमी आहेत का? जास्त उदाहरणे नको. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुका आताच झाल्या. भाजपाचे गणेश जोशी मुस्सुरी-डेहराडूनमधून पुन्हा निवडून आले. कोण हे जोशीसाहेब? हे तेच ज्यांनी निदर्शनांच्यावेळी शक्तिमान नावाच्या पोलीस घोड्यावर प्राणघातक हल्ला केला. शक्तिमान मरण पावला. खूप गाजले. मनेका गांधींनीही पक्षाकडे कारवाईची मागणी केली. पण यावेळी त्यांना उमेदवारी द्यावीच लागली. आणि लोकांनीही त्यांना दणदणीत विजय मिळवून दिला. घोषणा काय होती? “मस्सुरी कहे मन से, गणेश जोशी फिर से” आता बोला!
आपले खासदारसाहेब आणि उत्तराखंडचे आमदारसाहेब यादोघां मारकुट्यांमध्ये एख साम्य आहे. ते लोक त्यांना सारखे निवडून देतात. असे का होते. येथेच मी लोकशाहीच्या नावाने शिमगा करणाऱ्यांकडे बोट दाखवावे लागते. कारण हा वर्ग फक्त कृतिहीन बकवास करत राहतो. त्यांच्यातील काही तर मतदानही करत नाहीत. आणि मग नको ते निवडून जातात.
अर्थात तरीही मतदार दरवेळी अशांना सहन करतात असे नाही. अति झाले की लोकंही धडा शिकवतात. खासदार रवींद्र गायकवाडांना आठवण करुन द्यावी लागेल. ज्यांना कोणीच पाडू शकत नव्हते त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मसिंह पाटलांना अस्मान दाखवणारे मतदारही उस्मानाबादचेच आहेत. ते पैलवानांना पाडू शकतात तर प्राध्यापकांचा तासही संपवू शकतात. हाच इशारा इतरांसाठीही. लोकांना आणि लोकशाहीला कायम गृहीत धरु नका!