राणीच्या बागेचा होणार विस्तार, वाघ, सिंह पुन्हा डरकाळी फोडणार

0

मुंबई । भायखळा येथील मफतलाल कम्पाउंंडजवळील तब्बल 7 एकरच्या भूखंडावर मुंबई पालिका उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करणार असून, प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी 50 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात केली आहे. प्राणिसंग्रहालयातील 63 अंतर्गत उद्यानांचा विकास, प्राण्यांचे पिंजरे व पर्यटकांची वाढती गर्दी यामुळे पाण्याची वाढती गरज विचारात घेऊन प्राणिसंग्रहालयाच्या आवारातील मोठ्या विहिरीच्या स्वरुपात भूगर्भात असलेल्या मोठ्या जलसाठ्याशी योजनाबद्ध अंतर्गत जोडणी करण्यात येणार आहे. ही स्वयंचलित जलसिंचन प्रणाली सुरू करण्यात येणार असून ती 2018 च्या सुरुवातीला कार्यान्वित होणार आहे.

आधुनिकीकरण प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये प्रस्तावण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अंदाजे 120 कोटींचा खर्च येणार आहे. त्यात प्राण्यांच्या 17 पिंजर्‍यांची कामे अंतर्भूत असतील. सुरुवातीला निविदा 1 मध्ये कोल्हा, पाणमांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास पाँड कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, पक्षी पिंजरा-1 आणि सर्पालय या 10 प्राण्यांचे पिंजरे व आवासस्थानांचा समावेश आहे. निविदा 2 मध्ये वाघ, सिंह, सांबर आणि काकर, नीलगाय, चौशिंगा, काळवीट आणि पक्षी पिंजरा 2 यांच्यासाठी 7 पिंजरे व आवासस्थानांचा समावेश केला आहे.

सुरक्षेवर 5 कोटींची तरतूद
प्राणिसंग्रहालयातील सुरक्षा व दक्षता व्यवस्था वाढवण्यासाठी 5 कोटी 20 लाख इतक्या खर्चाने सीसीटीव्ही आणि पब्लिक ड्रेस सिस्टीम बसवण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या आवारात निर्माण होणारा सेंद्रीय कचरा संपूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी गांडूळ खत प्रकल्पाची 2 कोटी 20 लाख रुपये खर्चाने दर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याचे प्राणिसंग्रहालय आणि उद्यान कार्यालय पाडून त्याजागी अंदाजे 7 कोटी 80 लाख रुपये खर्चून ’लँडस्केप’चे काम हाती घेण्याची योजना आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आवारात असलेल्या अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले.