राणेंचा अखेर पत्ता कट!

0

मुंबई/पुणे : बहुचर्चित विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी राणेंची समजूत काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास लाड यांनी आपला अर्ज दाखल केला. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी दाखल केली. लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, अजित पवार यांचे विश्वासू सहकारी राहिलेले आहेत. भाजपने आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांत संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, लाड यांना शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे, भाजपची रणनीती आपणास मान्य असून, आपण आमदार होणारच आहोत, असे राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितले. जूनमध्ये रिक्त होणार्‍या जागांवर राणेंची वर्णी लागेल, असे वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले.

फडणवीस, दानवेंनी काढली राणेंची समजूत
काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य असताना पक्षातून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्या एकाच जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून राणेंना उमेदवारी देण्याची शक्यता पाहाता, शिवसेनेने त्याला विरोध दर्शवित विरोधी पक्षांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे शिवसेनेसोबत कटुता नको म्हणून भाजपने राणेंना उमेदवारी देण्याचे टाळले. दुसरीकडे, राणेंना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचे कोकणातील कट्टर विरोधक संदेश पारकर यांना उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने चालवली होती. त्यासाठी रविवारी त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यातही आले होते. परंतु, भाजपकडून राणेंचे नाव वगळले गेल्यानंतर पारकर यांची उमेदवारी रद्द झाली व सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने शब्द फिरविल्याबद्दल राणे कमालीचे नाराज झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तातडीने वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. रविवारी रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवे, फडणवीस आणि राणे यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत रणनीती आखण्यात आली. त्यानुसार प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.

उमेदवार असतो सेनेत फूट पडली असती : राणे
लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांना प्रसारमाध्यमांनी गाठले असता, राणेंनी सावध पवित्रा घेतला. भाजपने घेतलेली भूमिका मला मान्य असून, मी लवकरच आमदार होईल, असे राणे म्हणाले. मी उमेदवार असतो तर शिवसेनेत फूट पडली असती, असेही ते म्हणाले. आपल्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली असेही राणे यांनी सांगितले. तत्पूर्वी राणे यांना विधानपरिषद अथवा मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी राणे यांच्या मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असेही खा. दानवे म्हणाले. येत्या जून-जुलैमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांमध्ये राणे यांची वर्णी लागेल, असे राजकीय सूत्राने सांगितले असून, तसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राणेंना दिले आहे, असेही सूत्र म्हणाले. त्याचमुळे जूनच्याआधी काहीही होऊ शकते, त्यामुळे मी लवकरच आमदार होणार असल्याचे राणे यांनी ठणकावून सांगितले आहे.

‘अदृश्य बाण’ चमत्कार घडवणार!
येत्या 7 डिसेंबररोजी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून चमत्कार घडून येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज दाखल केल्यानंतर विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आदी मुद्द्यांवर शिवसेना सतत सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त करते आहे. काल-परवाच त्यांनी सत्ता सोडण्याचाही इशारा दिलेला आहे. एकंदर राजकीय परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

का झाला राणेंचा पत्ता कट?
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कडाडून विरोध.
* राणेंना भाजपने उमेदवारी दिली नसती तर शिवसेनेचा पाठिंबा मिळाला नसता.
* भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु होती.
* राणेंना आधी मंत्री करून मग निवडून आणता येणे शक्य आहे.
* जूनमधील विधानपरिषद निवडणुकीत सहज विजय शक्य