राणेंचा भाजप अन् मंत्रिमंडळ प्रवेशही निश्चित!

0

भाजपचे सदस्य किंवा सहयोगी सदस्य होण्याची राणेंची इच्छा

नवी दिल्ली : काँग्रेस व विधानपरिषदेची आमदारकी सोडल्यानंतर कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांनी काल रात्री उशिरा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत भाजपप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाली. तथापि, भाजपचे सहयोगी सदस्य होण्याच राणेंनी अनुकूलता दर्शविली असून, राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्यास शहा यांनी अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. 5 किंवा 6 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तत्पूर्वीच राणे आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील, असेही सूत्र म्हणाले. राणे यांच्यासोबत किती आमदार भाजपात येतील, याची चाचपणीही यावेळी शहा यांनी केली. त्यानुसार, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद जाणे निश्चित असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

राणेंकडे सार्वजनिक बांधकाम खाते?
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या कुडाळ येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. तथापि, या भेटीत राजकीय चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राणे यांच्यासाठी शहांकडे जोरदार मोर्चेबांधणी केली. राणे यांनी मात्र भाजपचे सदस्य होणे किंवा सहयोगी सदस्य होण्यात अनुकूलता दर्शविली. तसेच, आपल्यासोबत येणार्‍या आमदारांची नावेही शहा यांना सांगितली. तसेच, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी दोन दिवस अगोदर भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेऊ किंवा रितसर भाजपात प्रवेश करू, असेही राणेंनी शहा यांना सांगितल्याचे सूत्र म्हणाले. त्यामुळे पुढील आठवड्यात राणेंच्या राजकीय हालचाली स्पष्ट होणार आहेत. सद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील वगळता वरिष्ठ मंत्री नाही. त्यामुळे राणे मंत्रिमंडळात आले तर त्याचा फडणवीस यांना फायदाच होईल, अशी भूमिका खा. दानवे यांनी मांडल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार, राणे यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यास शहा हे तयार झालेत. सद्या हे खाते चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे.

पुढील आठवड्यात राणे भाजपात…
नारायण राणे यांनी काँग्रेससह शिवसेनेचे आमदार फोडण्याचीदेखील तयारी दर्शविल्याचे सूत्राने सांगितले. त्यामुळे शिवसेना पाठिंबा काढेल, ही पक्षनेतृत्वाची भीतीही दूर करण्याचा प्रयत्न राणे यांनी केला. तथापि, आपल्यासोबत येणार्‍या आमदारांच्या राजकीय पुनर्वसनाची जबाबदारी भाजपने घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. नीलेश व नीतेश राणे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दाही राणेंनी मांडला असून, त्यास अमित शहा अनुकूल झाल्याचेही सूत्राने सांगितले. त्यामुळे पुढील आठवड्यात राणे हे भाजपमध्ये दिसू शकतात किंवा सहयोगी सदस्य बनू शकतात, असेही वरिष्ठस्तरीय सूत्र खात्रीशीरपणे म्हणाले.