राणेंचा शपथविधी डिसेंबरअखेरीस?

0

नागपूर : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित असून, येत्या 27 डिसेंबररोजी त्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती राज्य सरकारमधील वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. तसेच, पिंपरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनाही राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची चर्चा सुरु असल्याचेही सूत्र म्हणाले. राणेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांचे मन वळविले असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंसह आ. आशीष देशमुख यांनी रा. स्व. संघाने आयोजित केलेल्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे या दोघांनाही पक्षाने नोटीस बजावली असल्याची चर्चा अधिवेशनस्थळी सुरु होती.

फडणवीस-राणे यांच्यात दीर्घ चर्चा
काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे यांनी आपला पक्ष एनडीएत सहभागी केला आहे. त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर भाजपने दिली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याची तयारी पूर्ण केली असून, 27 डिसेंबरला त्यांच्यासह इतरही काही जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. राणे यांना शिवसेनेचा विरोध होता. परंतु, हा विरोध दूर करण्यात फडणवीस हे यशस्वी झाले आहेत. गुजरात निवडणुकीनंतर शिवसेना शांत झाली असून, सरकारचा पाठिंबा काढून पायावर धोंडा पाडून घेणार नाही, याची खात्री पटल्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदलास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला. राणे यांच्यासह पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनाही राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असेही सूत्र म्हणाले. तथापि, त्याबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप झाला नव्हता. पिंपरी-चिंचवडमधून भोसरीचे अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे मंत्रिपदाचा निर्णय तूर्त रेंगाळला आहे, असेही सांगण्यात आले. तरीही आ. जगताप यांना राज्यमंत्री व शक्य झाले तर कॅबिनेट मंत्रीही करण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत. नागपुरात अधिवेशनाची धामधुम असताना मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस व नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला होता.

संघाने घेतले भाजप आमदारांचे बौद्धिक!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी भाजपच्या आमदारांची आपल्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदारांचे बौद्धिकही घेण्यात आले. तथापि, या बैठकीला नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दांडी मारली. त्यांच्यासह नाराज आमदार आशीष देशमुख हेदेखील बैठकीला गेले नाही. उलटपक्षी त्यांनी विधानसभेत हजेरी लावताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सभागृहात आगमन केले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. गैरहजेरीचे कारण पाठविणारी नोटीस या दोघांनाही पक्षाने दिली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दुसरीकडे, जे आमदार संघाच्या बैठकीला गैरहजर होते, त्या सर्वांना नोटीस बजावली जाणार असल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसेंचा गौप्यस्फोट
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी एका वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातून मला ऑफर असून कार्यकर्त्यांकडूनही दबाव वाढतो आहे, असा खडसेंनी गौप्यस्फोट केला आहे. परंतु, भाजप सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या मागे लागलेल्या चौकशीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही खडसेंनी म्हटले आहे.