काँग्रेसचे असंतुष्ट नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आता जवळपास भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून येत आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत सातत्याने वादळी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे राणे यांचा हा निर्णय कोकणच्याच नव्हे, तर एकंदरीतच राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे.
भुजबळांनी पवारांची साथ धरली असली, तरी राणेंनी काँग्रेसचा आश्रय घेतला. त्यांना मंत्रिपदही मिळाले. तथापि, राणेंचे लक्ष्य होते ते मुख्यमंत्रीपदाचे! मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना पद्धतशीरपणे झुलवले. त्यांनी अनेकदा दिल्लीच्या वार्या केल्या. मात्र, पदरी निराशा आली. दरम्यान, दिल्लीश्वरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवताना त्यांच्याकडे पुन्हा एकदा साफ दुर्लक्ष केले. तेव्हापासूनची राणेंची अस्वस्थता अनेकदा उघडपणे व्यक्त होऊ लागली. याचीच परिणिती म्हणजे ते भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत.
नारायण राणे हे वेळप्रसंगी अत्यंत फटकळपणे वागतात. यामुळे विरोधकच नव्हे, तर अनेकदा स्वकीयांनाही ते अंगावर घेतात. हा आक्रमकपणा शिवसेनेत चालणारा असला, तरी काँग्रेसमध्ये याला जराही स्थान नसल्याने त्यांची घुसमट होऊ लागली होती. यातून ते पक्षांतर करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरू लागली होती. त्यांची पहिली पसंती अर्थातच शिवसेनेला असेल असे मानले जात होते. अलीकडच्या काळात शिवसेनाप्रमुखांबाबत जाहीरपणे आदर व्यक्त करून त्यांनी तसे संकेतदेखील दिले होते. मात्र, मुळातच सत्तेत असूनही दुय्यम स्थान असल्याने शिवसेनेत खदखद असल्याचे त्यांनी लक्षात घेतले असावे. यातच केंद्र व राज्यातही भाजपचे वर्चस्व असल्यामुळे या पक्षाला त्यांनी प्राधान्य दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ‘सक्तवसुली संचालनालय’ म्हणजेच ‘ईडी’च्या संभाव्य चौकशीचे झेंगट लागण्याची शक्यता आहे. तसे संकेतदेखील मिळाले आहेत. याचा विचार करता त्यांना शिवसेनेऐवजी भाजपमध्ये जाण्याचा पर्याय हा केव्हाही उत्तम असल्याची बाब स्पष्ट आहे. याच अनुषंगाने ते मार्गक्रमण करत असल्याचे आता दिसून येत आहे. नारायण राणे यांचे कोकणात व विशेष करून तळकोकणात वर्चस्व आहे. मोदी लाटेच्या झंझावातात त्यांचा गत विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी त्यांचे पुत्र निवडून आले आहेत, तर अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांच्या गटाला चांगले यश लाभले आहे. या पार्श्वभूमीवर राणेंच्या प्रवेशाने कोकणात भाजपचे स्थान अत्यंत मजबूत होणार आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच नव्हे, तर शिवसेनेलाही जोरदार धक्का देण्याचे काम भाजप करणार आहे. मात्र, इथेदेखील त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील ही बाब उघड आहे. काँग्रेसश्रेष्ठींच्या लहरीपणावर राज्यातील नेत्यांना डोलावे लागते. अगदी त्याचप्रमाणे सध्या भाजपमध्ये मोदी आणि शहा यांचा शब्द अंतिम मानला जातो. याशिवाय राणे हे संघाचे नसून उपरे नसल्याचाही त्यांना फटका बसू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते भाजपमध्ये आले, तर बहुजनांचा चेहरा बनू शकतात. परिणामी, फडणवीस आणि त्यांचे समर्थक त्यांच्याशी सावधपणे वागतील असे मानले जात आहे, तर दुसरीकडे सुरेश प्रभू यांच्यासारखे मोदींचे निकटवर्तीय हे राणेंचे कट्टर विरोधकही त्यांच्या मार्गात अडथळे आणू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते भाजपमध्ये गेल्यास शिवसेनादेखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.
कोकणात शिवसेनेने अलीकडे बर्यापैकी गतवैभव प्राप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षाचा विरोध हा त्यांना त्रासदायक ठरू शकतो. अर्थात आजवर अशा अनेक आव्हानांना पुरून उरणारे राणे हे यावर कसे मात करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व गोंधळात भाजपला मात्र सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांची महत्त्वाची भूमिका आहे. बहुतांश नेत्यांनी याप्रकरणी मौन धारण केले असताना राणे कुटुंबाने आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरला आहे. तेच भाजपमध्ये दाखल झाल्यास याचा या पक्षाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांना खासदारकी प्रदान केल्यानंतर राणे यांना प्रवेश देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दिशेने भाजप महत्त्वाचे पाऊल टाकेल, असे मानले जात आहे. याचा अर्थातच 2019 साली होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुकूल परिणाम होण्याचे गणित भाजप नेत्यांनी मांडले असावे. अर्थात काहीही असले तरी नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा चांगलाच गाजणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचमुळे नारायण राणे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त आणि या बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांना नेमके काय मिळणार? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात साहजिकच प्रचंड कुतूहल निर्माण झाले असले तरी याचे उत्तर काळाच्या उदरातच दडलेले आहे.