मुख्यमंत्र्यांचे अप्रत्यक्ष संकेत
मुंबई : गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. यावेळी नारायण राणे, एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत. राणेंचे पुनर्वसन आम्ही करणार आहोत. ते आमच्यासोबत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले मात्र खडसेंचे पुनर्वसन अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले आहे.
राणेंना आमच्या कोट्यातून घेणार
मुख्यमंत्री म्हणाले, खडसे, राणे यांचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे, अशा व्यक्ती पक्षाची संपत्ती असतात. राणेंना आमच्या कोट्यातून घेणार आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच नाही, अशी हमीसुद्धा राणेंच्या बाबतीत फडणवीस यांनी दिली. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत त्यांनी काहीही ठोस वक्तव्य न करता ते प्रस्थापित नेते असल्याचे म्हणत बगल दिली.