मुंबई । शिवसेनेत प्रक्षप्रवेशाच्या वृत्तामुळे आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. शिवसेनेत प्रवेश मिळण्यासाठी आपण आटापिटा केल्याची बातमी धादांत खोटी असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिली. राणेंच्या कथित शिवसेना प्रवेशाच्या प्रयत्नांचे वृत्त पसरल्याने खवळलेल्या नितेश राणेंना ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला. ‘कोण कोणाचा पाठलाग करत होते हे ठरवा. नाहीतर एक दिवस आमच्यावरच तुमचे वस्त्रहरण करण्याची वेळ येईल.’ असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. कोण फोन करत होते? कोठे भेटण्यासाठी वेळ देत होते? याचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे, असे नितेश राणेंनी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरुन आहेत. मात्र राणेंनी हे वृत्त फेटाळून लावले होते. उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्या इतकी वाईट वेळ राणे कुटूंबावर आलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अफवा पसरावल्या जाताहेत. त्यात काही तथ्य नाहीत. आम्हाला इतके वाईट दिवस आले नाहीत.
– आ. नितेश राणे, अध्यक्ष, स्वाभिमान संघटना
राणेंना किंमत देत नाही – सुभाष देसाई
कोल्हापूर । अशा गोष्टींची आम्ही दखलच घेत नसल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापूर येथे म्हटले आहे. असे किती आले आणि किती गेले त्यांना शिवसेना पुरून उरली, अशा व्यक्तींची सेनेला गरज नाही, असे देसाई म्हणाले. शिवसेना नारायण राणेंना किंमत देत नाही, असा प्रहार देसाई यांनी केला. काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या असून राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला कोणताही फरक पडत नसल्याचेही सुभाष देसाई यांनी म्हटले. नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचे हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला कोणताही फरक पडत नाही, सुभाष देसाई म्हणाले.
आम्ही अशा गोष्टींची दखलच घेत नाही. असे किती आले आणि गेले. शिवसेना सर्वांना पुरून उरली.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री