मुंबई । राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची ’ऑफर’ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी राणेंना राजभवनावर बोलवून घेतले होते. भाजपकडून त्यांचा विचार राज्यसभेसाठी केला जात आहे, असे त्यांना सांगण्यात आले. 2019 ला राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राणे राज्यसभेचे हे गाजर स्वीकारतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणेंचा रोष ओढवून न घेण्याचा प्रयत्न
नारायण राणे आणि आशीष शेलार या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास सरकारची स्थिती सुधारेल, असे भाजपातील एका गटाला वाटते. सेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. काँग्रेसमध्ये त्यांना न पटल्याने ते बाहेर पडले. भारतीय जनता पक्षाने त्यांना जवळ केले आहे. त्यांना पुनर्वसनाचा शब्दही दिला आहे. 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंचा रोष ओढवून न घेण्याचाच भाजपचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे राणेंना शांत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेत.
राज्यसभेची ऑफर!
राणेंचे राजकीय डावपेच व अनुभवाबाबत भाजपला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे राणेंना ताटकळत ठेऊन भाजपला त्यांचा रोष ओढवून घ्यायचा नसल्याने त्यांना राज्यसभेवर घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असेही सूत्रांकडून समजते. राणे यांना सत्तेचे गाजर दाखवत वेगळा पक्ष स्थापन करण्याचा डाव भाजपने खेळला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नावाने स्थापित झालेला हा पक्ष अजूनही प्राथमिक स्थरावर आहे. परंतु, तरीही राणेंना आता जास्त प्रतीक्षा करायला लावणे परवडणारे नाही.