राणेंना संघाचा जोरदार विरोध!

0

मुंबई । नारायण राणे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जोरदार विरोध होत आहे. कोकणातील संघ कार्यकर्त्यांनी तसेच भाजपच्या एका गटाने राणेंना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला असल्याने त्याचे पडसाद भैय्याजी जोशी व अमित शहा यांच्या बैठकीत उमटले. भैय्याजी जोशी यांनी राणेंचा चेंडू सरळ भाजपच्या कोर्टात ढकलला आहे. दरम्यान राणे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग देखील बंद झाला असून ते नवा पक्ष काढून एनडीएत समाविष्ट होऊ शकतात अशी माहिती एका मंत्र्यांनी दिली.

शहा, जोशी यांची दोन तास खलबते
लोअर परळ येथील कोकण प्रांत राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या कार्यालयात मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा व भैय्याजी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. भैय्याजी यांच्या भेटीसाठी शहा हे दिल्लीवरून आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत राणे यांच्यावर काही वेळ चर्चा झाली. अप्पा गोगटे हे भाजपचे देवगड मतदार संघाचे आमदारही राहिलेले असून त्यांच्यानंतर त्यांचा पुतण्या व माजी आमदार अजित गोगटे हे पक्षाचे काम करत आहेत. गोगटे व नातू यांना राणे नको आहेत. राणे हे स्वयंकेंद्रीत नेते असून त्यांना भाजपची संस्कृती समजून घेणे कठीण होईल. संघटीत नेतृत्व ते मान्य करू शकतील का, हे एकदा स्पष्ट करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा, अशी भूमिका अजित गोगटे यांनी मांडली आहे. मात्र राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व माजी आमदार प्रमोद जठार यांची भूमिका गोगटेंसारखी स्पष्ट नाही. पक्ष नेतृत्वाला मान्य असेल तर राणेंच्या प्रवेशाला आमची काहीच आडकाटी नाही, असे हे दोन नेते सांगतात. याला पार्श्‍वभूमी आहे राणे व भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मैत्रीची.