शिवसेनेने ज्यांना मुख्यमंत्री केले होते, ते नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसकडे गेले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये 12 वर्षे राहून आता काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून राणे नक्की काय करणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला होती. सुरुवातीला राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, नारायण राणे आमच्या संपर्कात नाहीत, असे वक्तव्य करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेत संभ्रम निर्माण केला होता. मात्र, सोमवारपासून पुन्हा एकदा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. नारायण राणे हे सिंधुदुर्गातील रुग्णालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने अमित शहांना भेटणार आहेत. राजकारण्यांना कुणाला भेटण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. ते कुणालाही केव्हाही भेटू शकतात. राणेंना काँग्रेसने अचानकपणे दणका दिल्यामुळे व सिंधुदुर्गातील राणेंच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील कमिटी रद्द केल्यामुळे राणेंची राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे अडचणीत असलेल्या राणेंना भाजपने अजून प्रवेश दिलेला नाही. राणेंना भाजपच्या विचारधारेनुसार काम करणे शक्य असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया सोमवारी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली आहे. दिल्लीत सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. नारायण राणे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीला जाण्यापूर्वी सरोज पांडे यांना नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी म्हटले आहे की, राणे यांना भाजपच्या विचारधारेवर विश्वास आहे का? भाजपच्या पद्धतीने काम करणे त्यांना शक्य आहे का? तसे असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच घेतील, असे सरोज पांडे यांनी सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी देशभरातून 2500 आमदार दिल्लीत डेरेदाखल झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचाही समावेश होता. त्यामुळे राणेंनी भाजप प्रवेशासाठी अचूक मुहूर्त साधल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर अमित शहा आणि राणेंची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीत काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, राणेंना अटी देऊनच प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची गोष्ट मात्र खात्रीलायक वाटते. राणे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. इतक्या वर्षे पक्षात राहूनही राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नसल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावला. पक्षाकडे मी पद मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला हे पद दिलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली. चव्हाण म्हणतात, ते खरे आहे. राजकारणात व्यक्तीची निष्ठा महत्त्वाची असते. या निष्ठेचे चीज प्रत्येकाला मिळ्तेच. राणे यांनी दोन पक्ष आतापर्यंत बदलले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही पक्षाचा भरवसा राहिलेला नाही. राणेंना काँग्रेसची संस्कृतीच समजली नाही. काँग्रेसमध्ये कोणाला मंत्री करायचं, कोणाला काय पद द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष, त्यांचे सल्लागार, त्यावेळचे पक्षाचे सरचिटणीस अँटोनी यांच्या बैठकीत हे ठरलं, त्यामुळे माझं पद बदललं हा त्यांचा आरोप चुकीचा आहे, असे सांगत मला श्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदी नेमल्याचे त्यांनी म्हटले. नारायण राणेंनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप केला होता तसेच पृथ्वीराज चव्हाणांना एकदम मुख्यमंत्री करण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले होते.
राणेंचा हा कांगावा योग्य नसल्याचे दिसत आहे. राणेंनी आतापर्यंत दोन्ही पक्ष सोडताना कांगावा केला होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली दिसत नाही, उलट त्याच्या नाकाला मिरच्या झोंबल्याचे जाणवते आहे. कारण राणेंविरोधात शिवसेनेने मुंबईतील वरळी भागात एक बॅनर लावला होता. या बॅनरमध्ये नारायण राणेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. ‘इच्छा माझी पुरी करा’ शीर्षकाखाली राणे यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आलेे. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून राणेंवर जोरदार टीका केली. राणेंविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भाषेची पातळी सोडण्यात आली आहे. या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यावेळीही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून नारायण राणेंवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका करण्यात आली होती. मात्र, ते राजकीय व्यंगचित्र होते. वरळीत लावण्यात आलेले पोस्टर हे राजकीय व्यंगचित्र म्हणता येणार नाही. खरे तर राणे भाजपमध्ये जाणार आहेत म्हटल्यावर शिवसेनेकडून सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र या पोस्टरची मुंबईत चर्चा रंगली आहे. एवढेच नाही, तर राणेंनी भाजपप्रवेश केलाच तर हा पोस्टरचा वाद चिघळण्याचीही शक्यता वाटते. नारायण राणेंविरोधात ‘गद्दार’, ‘नारोबा’ ही आणि अशी अनेक शेलकी विशेषणे लावूनही नारायण राणेंवर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र, अशा पद्धतीने एखाद्यावर खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही. राजकारणाची पातळी खालावल्याचे दिसत आहे.
कोकणातील राजकीय क्षेत्रातील वादळी व्यक्तिमत्त्व आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या भरवशावर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला असला, तरी भाजपप्रवेशाच्या ‘नियम आणि अटी’ अजून निश्चित न झाल्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश लांबत राहिला आहे. राणे स्वत:ला राज्य पातळीवरील नेते म्हणवत असले, तरी काँग्रेस असो वा भाजप, कोकणचे नेते म्हणूनच त्यांच्याकडे पाहतात, हे स्पष्ट आहे. शिवसेनेचा त्याग करून राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सिंधुदुर्गातील शिवसेना त्यांनी धुऊन नेल्यासारखी परिस्थिती झाली होती. पण सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक त्यांना टक्कर देत राहिले, एवढेच नव्हे, तर मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी खुद्द राणेंनाच चीत करत राजकीय सूड घेतला. राणेंचा भाजपप्रवेश अजून अधांतरी असला, तरी राजन तेली आणि काका कुडाळकरांसारखे एकेकाळचे त्यांचे डावे-उजवे यापूर्वीच भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे उद्या भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्यासारख्यांशी जुळवून घेत राणेंना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील पराभवांसह अनेक बर्या-वाईट घडामोडींचा इतिहास मागे टाकत ते राजकारणाचा नवा डाव मांडू पाहत आहेत. भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त सतत लांबत असला, तरी आज ना उद्या ते घडणार, या विश्वासावर त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील कदाचित हा जुगार खेळला आहे. राणे स्वत:ला राज्य पातळीवरील नेते म्हणवत असले, तरी काँग्रेस असो वा भाजप, कोकणचे नेते म्हणूनच त्यांच्याकडे पाहतात, हे स्पष्ट आहे. त्या दृष्टीने त्यांचे उपयुक्ततामूल्य आणि उपद्रवमूल्य जोखून त्यानुसार त्यांना किती महत्त्व द्यायचे, याचा हिशेब हे पक्ष करत आले आहेत. राणेंचे त्याबाबतचे समज आणि भाजपचे व्यवहारवादी मूल्यमापन, यातील अंतरामुळेच अजून त्यांच्या भाजपप्रवेशाचा पेच सुटलेला नाही, असे सांगितले जाते. राणेंचा भाजपप्रवेश अजून अधांतरी असला, तरी राजन तेली आणि काका कुडाळकरांसारखे एकेकाळचे त्यांचे डावे-उजवे यापूर्वीच भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे उद्या भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्याशी जुळवून घेत राणेंना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. 2009 पासून कोकणात राणेंची ताकद घटत सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित झाली आहे, अशा परिस्थितीत भाजपप्रवेशामुळे सत्तेची ऊब मिळाली, तर राणेंनी त्याचा फायदा घेणे गरजेचे आहे.
– अशोक सुतार
8600316798