भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र येईल : चव्हाण; विधानपरिषद निवडणुकीत भाजपसह नारायण राणेंची जोरदार कोंडी
पुणे : स्वतःचा पक्ष स्थापन करून विधानपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करण्याची शक्यता असलेले माजी काँग्रेस नेते नारायण राणे यांची अभूतपूर्व कोंडी करण्यासाठी काँग्रेसने जोरदार व्यूहरचना आखल्याची माहिती गुरुवारी पुण्यात उघडकीस आली. विधानपरिषदेसाठी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ’उद्योग आणि रोजगाराची सद्यःस्थिती’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधक सत्ताधार्यांविरोधात एकत्र आले होते. आता विधानपरिषदेसाठी राणेंना उमेदवारी दिल्यास विरोधक एकत्र येतील, असे वक्तव्य त्यांनी करून राणेविरोधातील राजकीय रणनीतीच अप्रत्यक्षपणे चव्हाट्यावर आणली.
नोटाबंदीने 20 लाख रोजगार नष्ट
देशाची रोजगार स्थिती चिंताजनक आहे. औद्योगिक क्षेत्रात विभागीय समतोल राखण्यात अपयश येत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया अशा कोणत्याही योजनांचा उद्योग वाढीवर परिणाम होताना दिसत नाही. राज्यात एकही नवीन उद्योग आलेला नाही. केवळ करार केले जात आहेत. मोदी सरकार विकासदराचे आकडे फुगवून सांगत आहे. मात्र, सलग सहा तिमाहीत विकासदराची घसरण झाली आहे. जागतिक बँकेचा दाखला देऊन उद्योग-व्यवसायातील सुलभतेमधील क्रमवारी 100 व्या क्रमांकावर आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, हा क्रमाक भूषणावह नाही. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय लागू झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था थंडावली आहे. तब्बल 20 लाख रोजगार नष्ट झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारनिर्मिती आणि नवीन उद्योग गुंतवणुकीवर झाल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व घेण्यास सज्ज
बुलेट ट्रेनचा निर्णय चुकीचा असून, त्याऐवजी देशातील रेल्वेव्यवस्थेच्या सुधारणेसाठी काकोडकर समितीच्या शिफारशी लागू कराव्या. स्मार्ट सिटीसारख्या फसव्या प्रयोगाऐवजी सुनियोजित नगररचना असलेली नवी शहरे निर्माण केली पाहिजेत. काळा पैसाधारकांवरील कारवाईबाबत केंद्र सरकार गंभीर नाही, असा घणाघातही चव्हाण यांनी केला. युपीएचे सरकार असताना राहुल गांधी यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती काँग्रेसमधील नेत्यांनी केली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करून युवा नेतृत्त्वाची फळी निर्माण केली. आता ते काँग्रेसचे नेतृत्त्व हाती घेण्यास सज्ज झाले आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेल्या मी लाभार्थी जाहिरातीवरही चव्हाण यांनी सडकून टीका केली. जाहिरातीतील अनेक लाभार्थ्यांना स्वतःचा फोटो का वापरला याची माहिती नाही. राज्य सरकारची एकही योजना यशस्वी होत नसल्याने त्यांच्याकडून ही जाहिरातबाजी केली जात आहे. ज्या कंपनीला मी लाभार्थी जाहिरात करण्याचे काम दिले आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.