राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री राणे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चेने जास्त जोर धरला आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु काँग्रेसमध्ये सर्वत्र शांतता दिसत आहे, काँग्रेसचे नेते कुठल्याही प्रश्नावर सरकारविरोधात आक्रमकपणे उभे रहात नसल्याचे दिसत आहे. तसेच राणे यांच्यावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अजुन महत्वाची जबाबदारी दिलेली नाही. काँग्रेसमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना लवकर संधी दिली जाते. यामंळे कदाचित राणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असावेत असे वाटते. बऱयाच वेळा प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी वेळोवेळी आपली पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करायचा निश्चित केल्यास त्यांच्याबरोबर मुंबईतील काही नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वाटते. याचाच काँग्रेसपेक्षा शिवसेनेला जास्त धोका आहे. राणे यांच्याबरोबरच दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महापौर पदापासून सर्वच समित्या भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास मुंबई महापालिकेतील भाजप पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे, तसेच राणे यांना चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. नायगाव येथील सुप्रिया मोरे आणि गोवंडी येथील विठ्ठल लोकरे हे काँग्रेसमधील राणे समर्थक नगरसेवक मानले जातात. तर इतर सहा नगरसेवक राणे यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
राणे यांच्याबरोबरच दहा ते बारा नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास त्यांना पुन्हा निवडणूक लढवून जिंकून यावे लागेल. त्यापैकी निम्मे नगरसेवक निवडून आले तरी भाजप शिवसेनेला आव्हान देऊ शकते. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात अवघ्या चार नगरसेवकांचा फरक आहे. त्यामुळे काँग्रेसमधून आलेले सहा नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनेच्या पालिकेतील सत्तेच्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो. भाजपचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त झाल्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून फेरनिवडणूक घ्यावी लागेल. मात्र, यात मनसेच्या नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. मनसेचे सात नगरसेवक आहेत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंग पावू शकते. काँग्रेसही आयत्यावेळी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो. मात्र, समित्यांमध्ये भाजपचे संख्याबळ वाढणार असल्याने स्थायीसह सर्व समित्या त्या पक्षाच्या ताब्यात येण्यात कोणतीही अडचण नाही. मुंबई महापालिकेतील राजकारण ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे. महापालिकेत शिवसेनेचे अपक्षांसह 88 नगरसेवक आहेत तर भाजपचे अपक्षांसह 84 नगरसेवक आहेत. महापालिकेत काँग्रेसचे 30 नगरसेवक आहेत. त्यामुळे 20 नगरसेवकांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्यता नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक फुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राणे यांच्यासोबत जाणाऱया नगरसेवकांना फेर निवडणुकीला समोरे जावे लागेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. शिवसेनेने विधानसभेत एकाच सत्तेत राहून सत्ताधारी भाजपची प्रत्येक बाबतीत अडवणूक करण्याचे धोरण राबविले आहे.
भाजपला आक्रमक शैलीचे नारायण राणे पक्षामध्ये हवे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. नारायण राणे भाजपमध्ये आल्यास भाजपचे मुंबई महापालिकेतील वजन वाढणार आहे; राजकारणाची खेळी जर चांगल्या पद्धतीने झाली तर महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती येण्याची शक्यता आहे. भाजपला सर्वत्र मिळत असलेले यश पाहता अनेक पक्षांतील नेते, कार्यकर्ते, उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याचेच धोरण ठेवत आहेत. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा एक महिन्यापासून सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. अमित शाहांच्या मुंबई दौर्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसेच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय त्यांच्यासमोर उरला आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौर्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश लांबला आहे. राणेंचा पक्षप्रवेश लांबण्याची इतरही काही कारणे होती. राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजपकडून गेले काही दिवस सुरु होती. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आशिष शेलार दिल्लीत गेले होते त्यामागे राणेंचा भाजप प्रवेश हेच प्रमुख कारण असल्याचे समजते आहे. राणेंमुळे भाजपला कोकणात काय फायदा होईल याचीही चर्चा शाहा आणि शेलार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की. भाजप प्रवेशानंतर नारायण राणे यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे राणेंना आता राज्यातील नव्हे तर केंद्रातील राजकारणात रस असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राणे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काही षदिवसांपूर्वी म्हटले होते की, राणेंनी पक्षप्रवेश केल्यास त्यांना मी माझे पद देईन. भाजपकडे मराठा समाजाचा आक्रमक शैलीचा नेता हवा आहे, त्यामुळे राणेंच्या पक्षप्रवेशासाठी भाजपमध्ये उत्सुकता आहे. पुढे काय होईल हे नक्की सांगता येणार नाही, परंतु राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वाटते.