भारतीय जनता पक्षात नाराजांची संख्या काही कमी नाही. परंतु, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीचे कारण वेगळे आहे. खडसेंना मुद्दामहून पक्षात बाजूला सारले जात आहे. त्यांच्यासारख्या नेत्याची अवस्था या महाराष्ट्राला पहावली जात नाही. ज्या लोकांना खडसेंनी मोठे केले तेच नेते आता खडसेंना पाण्यात पाहू लागले आहेत. पक्षात अन् सत्तेत योग्य तो सन्मान राखला जात नसेल तर नाथाभाऊंनी आता पक्ष सोडावाच; तसेही या सत्तेला ओहोटी लागलीच असून, नाथाभाऊ बाहेर पडले तर कोणतीही लाट भाजपला तारणहार ठरू शकणार नाही. नाथाभाऊ असोत, नारायण राणे असोत, बबनराव पाचपुते असोत किंवा पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे ज्येष्ठ अन् दिग्गज नेते असोत. ही माणसे राज्य भाजपात ‘अडवाणी’ झाली आहेत!
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीतील या पक्षाच्या यशाचे शिल्पकार एकनाथ खडसे यांना पक्षाने सद्या अडगळीत टाकले आहे. जी गत नाथाभाऊंची तीच गत पक्षाने नारायण राणे यांचीही करून सोडली. पांडुरंग फुंडकर हेदेखील पक्षाचे ज्येष्ठच नेते; त्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्या टप्प्यात कृषिमंत्रीपद मिळाले. कृषिमंत्री असले तरी त्यांच्यापेक्षा या खात्यात सदाभाऊ खोत यांचेच जास्त चालते. म्हणजे, फुंडकर नामधारी मंत्री आहेत. राणे असो, नाथाभाऊ असो, फुंडकर असो या ज्येष्ठ नेत्यांच्या वाट्याला जे दिवस आलेत ते पहावल्या जात नाहीत. एककाळ असा होता की या नेत्यांचा राज्यात दरारा होता. हे नेते लादलेले नाहीत तर मास लीडर आहेत; तरीही आजची या लोकांची राजकारणात झालेली दैनावस्था ही त्यांचे मनोबल आणि राजकारण दोन्हीही खच्चीकरण करणारी आहे. काल-परवा नाथाभाऊंनी जळगावात बोलताना, आपल्या मनातील सल बोलून दाखविली. ते म्हणाले होते, ‘रहते थे कमी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह, बैठे हैं उन्ही के कूंचे मे हम, आज गुनहगारो की तरह’! पक्ष सोडण्याची शून्य इच्छा आहे. परंतु, आपणास पक्षाबाहेर ढकलेले जात आहे, या शब्दांत नाथाभाऊंनी आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्यासारख्या बलाढ्य राजकारण्यावर अशी वेळ यावी हे निव्वळ अन् निव्वळ दुर्देव आहे. नाथाभाऊ हा पक्ष तुमचा सन्मान करत नसेल तर आता भाजप सोडा. तुम्हीच स्वतः मोठा राजकीय पक्ष आहात; आणखी अवहेलना करून घेतल्यापेक्षा एकदाचा सोक्षमोक्ष लावाच; जनता तुमच्यासोबत आहे, तमाम बहुजन समाज तुमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा, काँग्रेसमध्ये जा किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करा; परंतु भाजपात राहून आणखी अपमानास्पद वागणूक सहन करू नका, हा तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांचा मनोदय आहे, त्या मनोदयाचा गांभिर्याने विचार आता नाथाभाऊंनी केलाच पाहिजेत. भाजपमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे, ही एकाधिकारशाही फडणविसीपेक्षाही भयानक आहे. केंद्रात नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने कारभार हाकत आहेत, त्याच पद्धतीने राज्यातही कारभार हाकण्याची नक्कल केली जाते. त्यातच आपल्या मार्गात अडचणीचे ठरू शकतील अशी माणसे दूर केली जात आहेत. नाथाभाऊ हे याच मानसिकतेचे बळी ठरले आहेत.
भाजपच्या सत्ताकाळात अनेक घोटाळे झालेत, त्या सर्वांना क्लीनचिट मिळाली; परंतु नाथाभाऊंनी असा कोणता घोटाळा केला म्हणून त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले जात आहे, त्यांना राजकीय अडगळीत टाकले जात आहे? गेली 40 वर्षे हा बहुजन नेता भाजपशी एकनिष्ठ आहे. शेठजी-भटजींचा पक्ष अशी या भाजपची ओळख होती. आजही खरी ओळख तीच आहे. परंतु, ही ओळख बदलविण्याचे काम राज्यात ज्या नेत्यांनी केले त्यात नेत्यांत नाथाभाऊ हे एक अग्रेसर असे नाव राहिले आहे. स्व. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर या नेत्यांमुळेच हा पक्ष तळागाळात पोहोचला. आतादेखील सत्ता मिळाली ती याच नेत्यांच्या कष्टामुळे! परंतु, सत्ता मिळताच या प्रमुख नेत्यांना बाजूला सारून नवख्यांच्या गळ्यात सत्तारुपी सुंदरीची वरमाला पडली. फुंडकर हे विदर्भातील दिग्गज नेते. परंतु, त्यांनाही मंत्रिपदाच्या पहिल्या यादीच स्थान मिळाले नव्हते. ते नाराज झाले तेव्हा त्यांना दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारात कृषिमंत्रीपद मिळाले. या मंत्रिपदाचा बहुतांश कारभार तर राज्यमंत्रीच हाकलतो आहे, सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी हे राज्यमंत्रिमहोदयच दिसून येतात. फुंडकर कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांना साईड पोस्टिंग दिल्यागत त्यांची गत झाली आहे. अलिकडे देशभरात एक नवीच राजकीय म्हण तयार झाली. खास करून ही म्हण अडगळीतील राजकीय नेत्यांसाठी वापरली जाते. ‘एखाद्याचा अडवाणी होणे’! राज्यातील भाजपात खडसे, फुंडकर यांचेदेखील अडवाणीच झाले आहेत. खडसे असो की फुंडकर असो किंवा नारायण राणे असोत, या मराठ्या नेत्यांचे झालेले खच्चीकरण कुणालाही पहावले जात नाही. राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुखीच होते. किमानपक्षी दुसर्या स्थानावरील ते प्रमुख नेते होते. निर्णयप्रक्रियेत ते महत्वाचे नेते होते. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली असती तर ते पुन्हा उपमुख्यमंत्री किंवा महसूलमंत्री तर नक्कीच बनले असते. परंतु, पदरात पडेल त्या मंत्रिपदाच्या आमिषाने ते भाजपच्या नादाला लागले. भाजपने त्यांना काँग्रेस सोडायला लावली. त्यांना आमदारकीचा राजीनामाही द्यायला लावला. त्यांना भाजपात न घेता, स्वतःचा पक्ष काढायला लावला. अन् हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत समाविष्ट करून घेतल्याची घोषणा केली. परंतु, राणेंच्या पदरी अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. राणेंना शिवसेनेचा कडवट विरोध पाहाता, खरेच त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही, याची काहीही खात्री नाही. मंत्रिपद तर नाहीच नाही उलटपक्षी आमदारकी गेली, अशी राणेंची गत झाली आहे. राणे हे आक्रमक नेते आहेत, परंतु त्यांचे ज्या पद्धतीने खच्चीकरण केले गेले, ते पाहाता त्यांची आक्रमकता पुरती गळून पडली. फार काही खटाटोप न करता शांत बसणे आणि मंत्रिमंडळात घ्या, ही विनवणी करणे यापेक्षा राणेंच्या हाती काहीही उऱले नाही. जे मराठा नेते भाजपच्या नांदी लागले असतील, त्यांनी एक लक्षात ठेवावे, हा भाजप आहे; काँग्रेस नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तर अजिबात नाही. ज्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले, राज्यात कॅबिनेट मंत्रिपद भूषविले आणि राजकारणातील चाणाक्ष नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, त्या बबनराव पाचपुते यांचीही काय गत झाली? वनमंत्री राहिलेल्या बबनरावांना आज वनवास आला आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन न करता भाजपने त्यांना असेच अडगळीत टाकले. त्यांचे राजकारण संपले की काय? अशी शंका यावी अशी दुर्देवी गत बबनरावांची होऊन बसली आहे.
नाथाभाऊ हे खरे तर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. किंबहुना, ते मुख्यमंत्री होतील म्हणूनच राज्यातील बहुजन समाजाने भाजपला मते दिली होती. मुख्यमंत्रिपद तर सोडाच; नाथाभाऊंना मंत्रिपदावरही ठेवू नये, या भाजपच्या नतद्रष्टेपणाला काय म्हणावे? ‘माझा न्याय होत नाही, मी गुन्हेगार असेल तर तुरुंगात टाका, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई करा, माझी भाजप सोडण्याची अजिबात इच्छा नाही. पण, पक्षच दूर लोटत असेल तर पर्याय नाही. राजकारणात काहीही अशक्य नसते’ अशी निर्वाणीची भाषा नाथाभाऊंनी काल-परवा केली होती. त्यांच्या रोखठोक भाषेचा भाजपातील चाणक्यांवर कितपत प्रभाव पडेल, हे सांगता येत नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरु आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात नाथाभाऊ तुमचे पुनर्वसन होत नसेल तर खरेच हा पक्ष सोडा! कुठेही जा, अगदी राष्ट्रवादीत जा किंवा काँग्रेसमध्ये जा, परंतु, तुम्हाला अपमानास्पद वागणूक देणार्या पक्षात राहू नका, असा सल्ला आम्ही खास करून देत आहोत. नाथाभाऊ ज्या पक्षात गेले त्या पक्षाची राज्यात ताकद वाढणार आहे. खान्देश हा नाथाभाऊंचा बालेकिल्ला आहे; यासह ग्रामीण भागात नाथाभाऊंची जोरदार पकड आहे. त्यामुळे ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाला हत्तीचे बळ प्राप्त होणार आहे. म्हणूनच, अजितदादा पवार असोत की खा. अशोक चव्हाण असोत, दोन्हीही नेते त्यांना आपल्याच पक्षात या, म्हणून निमंत्रण देत आहेत. महाराष्ट्रात 2019मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूकही घेण्याची भाजपनेतृत्वाची मानसिकता बनली आहे. तेव्हा आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर स्वबळाचा नारा दिलाच आहे, शिवाय त्यांची थेट लढत ही भाजपशीच राहणार आहे. खरे तर या निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना भाजपचे नेतृत्व सद्या अस्वस्थ आहे. गुजरातची सत्ता राखताना नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीच्या नाकीनऊ आले होते. त्यातच या वर्षात आठ राज्यांच्या निवडणुका या जोडगोळीला लढायच्या आहेत. यापैकी कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशात तर या जोडगोळीला जिंकण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. 2014च्या निवडणुकांत मोदी लाटेने देशाची एकहाती सत्ता खेचून आणली. पुढच्या वर्षी भाजपकडे मोदी असतील परंतु, मोदी नावाची जादू चालणार नाही. कारण, ही लाट आता ओसरली आहे. त्याची झलक गुजरातमधील पाटीदार, दलित नेत्यांच्या आंदोलनांनी तसेच भीमा कोरेगावच्या घटनेने दाखविलीच आहे. देशातील राजकारणाचे, समाजकारणाचे सगळे संदर्भ आता बदलून गेले असून, त्यातही राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले नाथाभाऊंसारखे नेतेच जर पक्ष सोडून जात असतील तर भाजपची होणारी वाताहत कुणीही थांबवू शकणार नाही. शेतकर्यांच्या रखडलेल्या कर्जमाफीचे खुद्द शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने जोरदार भांडवल चालविले आहे. दलित व मराठा समाजात दरी वाढली आहे, राहुल गांधी यांना गुजरातमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेसची मरगळ दूर झाली आहे, शरद पवार राज्यात तळ ठोकून असून, ते जोरकसपणे कामालाही लागले आहेत. शिवसेना सोबत नाही, दोन्ही काँग्रेस आघाडी करून लढत देणार आहेत, त्यातच नाथाभाऊ नाराज आहेत; त्यातच नारायण राणेंचा संतापही आडवा येणार म्हटल्यावर या निवडणुकीत भाजपचे काय हाल होतील, हे फार विस्ताराने सांगण्याची गरज नसावी! भाजप नेतृत्वाने वेळीच सावध व्हावे, नाथाभाऊ असोत, की राणे या मराठा नेत्यांची नाराजी तातडीने दूर करावी. त्यांचा योग्य तो सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे. हा सन्मान ठेवत नसाल तर त्याची राजकीय किंमतदेखील चुकविण्याची तयारी ठेवावी लागेल!!
–पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक/ दैनिक जनशक्ति, पुणे