नवी मुंबई :- कॉंग्रेस नेते नारायण राणे येत्या २७ ऑगस्ट ला भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असता आता त्यांच्या समर्थकांनी ही त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत ते जातील तिथे जाण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबईचे राणे समर्थक अन्वर खुल्ली यांनी समर्थकांसह नेरूळ येथील स्वाभिमान कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
नारायण राणे हाच आमचा पक्ष आहे,ते जातील तिथे जाऊ असा इशारा देत राणे समर्थकांनी आता नारायण राणे यांच्याबरोबर भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.राणे जरी भाजपमध्ये गेले तरी आम्ही त्यांच्याबरोबर समर्थक म्हणूनच काम करणार असे यावेळ खुल्ली यांनी सांगितले.ते जे सांगतील तो निर्णय आंम्हाला मान्य राहणार आहे.एक राज्यातला दमदार नेता म्हणून त्याची ओळख महाराष्ट्राला झाली असून त्यांच्या माध्यमातून आता नव्याने राज्याच्या राजकारणाला एक कलाटणी मिळणार असल्याचे यावेळी खुल्ली यांनी सांगितले.इतर समर्थकांचे मत जाणून घेण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेरूळ येथील स्वाभिमान कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी कमलेश राणे (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष,स्वाभिमान) व वशिष्ट यादव (रायगड जिल्हा अध्यक्ष,स्वाभिमान),इतर पदाधिकारी उपस्थित होते.राणे समर्थकांच्या एकत्र राजीनाम्यानी शहरातील कॉंग्रेस पक्षात मोठी खिंडार पडणार असल्याने याचा फटका त्यांना येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर जर राणे भाजपमध्ये आले तर शहरात मोदी समर्थक आणि राणे समर्थक असे दोन गट पडणार आहे.त्यामुळे राणे पक्ष बदलण्याअगोदरच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.काही दिवसांतच राणे भाजप मध्ये प्रव्रेश करणार असल्याचे संकेत मिळत असतांनाच इतर शहरातील समर्थकांनीही त्यांच्या सोबत जाण्याचा इशारा दिला आहे.