राणे पक्षांतर आणि मध्यावधी!

0

काँग्रेसचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक नारायण राणे हे काँग्रेस सोडून भाजपवासी होत आहेत. मुळात राणे हे तात्विकदृष्ट्या कधीच काँग्रेसचे नव्हते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली काय, अन् भाजपमध्ये गेले काय? त्याने काहीही फरक पडणारा नाही. सत्ता ही राणेंची गरज आहे; त्यामुळे शिवसेना विरोधात असताना ते सत्तेसाठी कासावीस झाले होते. आताही काँग्रेस सत्तेत नाही, ही त्यांची मोठी शोकांतिका आहे; त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, पुन्हा काँग्रेस कधी सत्तेवर येईल? याबाबत त्यांना काहीही खात्री नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते असताना राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध करत, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाच शिंगावर घेतले होते. तेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता होती. राणे काँग्रेसमध्ये आले आणि महसूलमंत्री झाले. तरीही मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते, ते मात्र काँग्रेसने कधीच पूर्ण केले नाही. राणे हे काँग्रेसला कधीच विश्वासनीय वाटले नाही. दिल्लीच्या दरबारी राजकारणाचा पिंड वेगळा असतो, आणि राणेंचा राजकीय पिंड वेगळा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केलेले राणे काँग्रेसच्या संस्कृतीत कदापि बसणारे नव्हते आणि नाहीत. त्यामुळे त्यांची नेहमीच पक्षात घुसमट झाली. दिल्लीत जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हाच राणेंना कमळ खुणावत होते. परंतु, त्यांनी संयम पाळला. कदाचित, राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असे त्यांना वाटले असावे. राणे यांच्याविरोधात केवळ शिवसेना आहे; असेच नाही तर काँग्रेसमधील एक मोठा गटही त्यांच्याविरोधात सक्रीय आहे. त्याचमुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जेव्हा राणे उभे राहिले तेव्हाच काँग्रेसच्याच एका गटाने शिवसेनेला साथ देत, राणेंना पाडण्याचे काम केले. केवळ शरद पवार वगळता सर्वांनी त्याचवेळी राणेंच्याविरोधात प्रचार केला असल्याचे पुढे उघडकीस आले होते. आदर्श सोसायटी घोटाळ्यात अशोक चव्हाण यांचे नाव बदनाम झाले, तरीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लावण्यात आली. पक्ष पातळीवरदेखील मोठी पदे वाटताना कायमच राणेंना डावलण्यात आले. काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट सहन करण्याची राणेंची कधीच मानसिकता नव्हती. त्याचमुळे ते आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर तोफ डागताना आढळून आलेत.

राणे हे भाजपात जाणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते जेव्हा त्यांनी व मुख्यमंत्र्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. परंतु, वाटाघाटी पूर्ण न झाल्याने त्यानंतर राणेंचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला. आता राणेंना पक्षात प्रवेश देण्याची वेळ योग्य असल्याचे पाहून भाजपने त्यांच्यासाठी पक्षात येण्याकरिता दार उघडले आहे. राणे भाजपात आले तर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला निश्चित असा काहीही फायदा नाही. फक्त ते येताना सोबत काँग्रेसचे किती आमदार घेऊन येतात, ते पहावे लागणार आहे. राणे आणि उद्धव ठाकरे यांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. राणे भाजपात आले आणि शिवसेनेला मनासारख्या मंत्रिपदाच्या जागा वाढवून दिल्या गेल्या नाही तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकते. तसेच झाले तर देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवर राहण्यासाठी 23 आमदार कमी पडतील. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तेव्हा सरकार वाचवायचे असेल तर राणेंना या 23 आमदारांची भरपाई करावी लागेल. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेच्या 25 आमदारांचा विरोध आहे. तर काँग्रेसमधून राणेंसोबत सात आमदार येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. एकूणच काँग्रेस व शिवसेनेतील 23 आमदारांचा गट घेऊन राणे भाजपात येऊ शकत असतील तरच फडणवीस यांना राणेंचे भाजप आगमन फायदेशीर ठरू शकते.
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत कोकणचा बालेकिल्ला भाजपला जिंकून देण्यासाठी राणेंचा वापर करता येईल; परंतु तूर्त तरी शिवसेना देत असलेली धमकी गांभीर्याने घेण्याशिवाय फडणवीस यांच्याकडे अन्य पर्याय नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार चालविणे ही मोठी कसरत ठरणार असून, त्यासाठी संख्याबळ कसे उभे करावे? हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न जर राणे सोडवून देऊ शकत असतील तर मग् भाजपला राणेंच्या पक्षप्रवेशाबद्दल काहीच अडचण असण्याचे कारण नाही. राणे काँग्रेस सोडून जात असताना त्यांच्यासोबत किती आमदार जाऊ शकतात, याचा अंदाज कदाचित काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतला असावा, तसेच यापूर्वी त्यांच्यासोबत शिवसेना सोडणार्‍या आमदारांचे काय झाले? याची जाणिव काँग्रेसच्या आमदारांना आहेच; यास्तव राणेंसोबत फार काही आमदार जातील, असे वाटत नाही. उलटपक्षी राज्य व देशात असलेली मोदी लाट आणि शिवसेना नेतृत्वाविषयीची अनिश्चित भूमिका या बाबी पाहाता, शिवसेनेचे आमदार मात्र राणेंच्या पर्यायाने भाजपच्या गळाला लागू शकतात. राणेंचा भाजपप्रवेश हा शिवसेनेच्या मुळावर उठणारा असून, त्यातून काँग्रेसची फारशी राजकीय हानी होण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. तसेही, राणे हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरु झाली तेव्हापासून काँग्रेसने त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमालाही त्यांना बोलाविले गेले नाही. त्यांना काँग्रेसमध्येच नव्हे तर भाजपमध्येही कुणी फारसे गांभीर्याने घेत नसावेत, असे दिसते. त्यामुळेच त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुणीही भाजप नेता फारसा गांभीर्याने बोलताना दिसत नाही. तसेच, राणेंच्या प्रवेशाला मुहूर्तही देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्तेसाठीच राणे भाजपमध्ये जात आहेत, हे अगदी उघड आहे. त्यामुळे उद्या भाजपची सत्ता गेली तर ते अन्य कोणत्याही सत्ताधारी पक्षात ते दिसू शकतात, ही जाण बहुतांश राजकीय पक्षांना झालेलीच आहे!