कणकवलीः राज्यात भाजप-सेनेची युती झाली असली तरी कोकणात मात्र युतीबाबत साशंकता आहे. कणकवलीत राणे यांचे पुत्र नितेश राणे हे भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र युती झाली असताना देखील शिवसेनेने देखील याठिकाणी अधिकृत उमेदवार दिला आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री यांनी नितेश राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेत, निवडून देण्याचे आवाहन केले. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कणकवलीत सेनेच्या उमेदवारासाठी सभा घेतली. यावेळी राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे असा टोला लगावला.
शिवसेनेत होते त्यांना काढले, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढले, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत आणि खुनशी प्रवृतीविरुद्ध आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाला राणेंचे शाप आहेत. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपाला सावध करतोय, भाजपात खूनशी वृत्ती नको. विनायक राऊत थांबले, वैभव नाईक उभा राहिला अन् त्यांना गाडले. आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. वाकवली ती मान आणि मने पक्ष स्वाभिमान. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे. मी टीका करायला आलो नाही, मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली आहे.
दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तोडून-मोडून टाकू, कोकणी जनता भोळी-भाबडी आहे, परंतु अद्यापपर्यंत मर्दुमकी शिल्लक आहे हे कोणी विसरू नये. येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवा फडकावू, आम्ही गेली अनेक वर्षे त्यांना पाळले, परंतु आता ते मित्राकडे सुद्धा नको, अशी आमची मागणी होती. तरीसुद्धा त्यांना पक्षात प्रवेश देणाऱ्या भाजपाला आम्ही शुभेच्छा देतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.