मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे कॉग्रेस सोडायला उत्सुक असल्याच्या बातम्या दिर्घकाळ येत आहेत. पण आता ते भाजपाच्या श्रेष्ठींना भेटायला दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे. आधी ते शिवसेनेत परतण्याच्या बातम्या होत्या. पण राणे वा राज ठाकरे यांना शिवसेनेत घेण्यास मातोश्रीवरच्या बारभाईंचा कडवा विरोध आहे. राणेंसारखी मुलूखमैदान तोफ़ पक्षात दाखल झाल्यास, सेनेला त्याचा मोठा लाभ होऊ शकतो. पण कर्तृत्वहीन बांडगुळे मात्र धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच अशा लोकांनी पालिका निवडणूकीपुर्वी बाळा नांदगावकर यांना हात हलवित परत पाठवले होते आणि राणेंना सेनेत येऊ दिलेले नाही. तेच राणे भाजपात गेल्यास मात्र सेनेची तारांबळ उडवून देऊ शकतील.
आगामी राजकारणात कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्यापेक्षा शिवसेना हेच आव्हान असल्याने, फ़टकळ व जशास तसे उत्तर देणारा नेता भाजपाला हवा़च आहे. आशिष शेलार वा किरीट सोमय्या मुद्दे घेऊन बोलणारे असले, तरी त्यांच्यात आक्रमकता फ़ारशी नाही. सेनेला सेनेच्या भाषेत रांगडे उत्तर व प्रतिकार करण्याची क्षमता असलेला नेता भाजपाला हवाच आहे. तो नाराय़ण राणे असेल, तर अधिकारवाणीने उद्धव किंवा शिवसेनेची लक्तरे करू शकतो. उलट राणे सेनेत दाखल झाले तर भाजपाला जशास तसे उत्तर देणारा सेनेच्या गोटात असेल. पण ती वेळ टळून गेली असे म्हणतात. राणे यांचे भाजपाशी साटेलोटे जमले आहे.
रस्त्यात उतरून व दोन हात करून शिवसेनेला उत्तर द्यायचे असेल तर राणे यांच्यासारखा पर्याय नाही. कारण सामान्य शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या नारायण राणेंच्या इतकी शिवसेना खुद्द सेनेतील कुठल्याही अन्य नेत्यालाही ठाऊक नाही. म्हणूनच सेनेशी दोन हात करायला राणे सारखा हाडाचा शिवसैनिक भाजपासाठी मोठा प्रभावी हत्यार असेल. आधीच पालिकेत फ़टका बसलेल्या शिवसेनेला राणे मैदानातही पळता भूई थोडी करू शकतील.