राणे यांची वाट आणि चाल

0

राज्याच्या राजकारणात अलीकडच्या दोन दशकांचा विचार करता अनेक नेते त्यांच्या आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जातात. यात नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. सत्तेत असो की विरोधात, राणे यांची भूमिका कायम वर्चस्ववादी असल्याचे राज्याने पाहिले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमधील घुसमट सहन करणार्‍या नारायण राणे यांनी पक्षत्याग केल्याची बाब तशी कुणाला अनपेक्षित वाटली नाही. किंबहुना त्यांनी यासाठी बराच वेळ घेतल्याचेही काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अर्थात त्यांच्या पक्षत्यागाला समकालीन राजकारणातील अनेक दृश्य-अदृश्य घटनांचा असणारे आयाम तपासून पाहिलो असता अनेक बाबींचे आकलन होते. खरं तर राणे यांनी शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा जास्त गाजला होता. शिवसेनेला अनेकदा खिंडार पडले असले तरी छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्याप्रमाणेच नारायण राणे यांनी दिलेला हादरा मातोश्रीच्या वर्मी लागला होता. यामुळे गेल्या एक तपापासून राणे विरुद्ध शिवसेना असा सामना कायम रंगत आला आहे. मध्यंतरी ही कटुता बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याचे चित्र होते. ठाकरे आणि राणे कुटुंबीयांमधील वैमनस्यदेखील थोडे कमी झाल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. असे असतानाही राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत शिवसेनेला टार्गेट केल्याची बाब लक्षणीय आहे. अर्थात हा भाजपचाच अजेंडा असल्याची बाब हेरून त्यांनी या प्रकारची भूमिका घेतल्याची शक्यतादेखील आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्रे गेल्यानंतर आपल्याला पक्षात कायम दुय्यम स्थान मिळेल हे हेरून राज यांच्यासह राणे यांनी पक्षत्यागाची भूमिका घेतली होती. राज यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचे धाडस दाखवले असले, तरी राणेंनी मात्र मंत्रिपदाला प्राधान्य दिले होते. राणे यांच्या या वास्तववादाला अजून एक किनार होती. त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बनवण्याचे आश्‍वासन दिले होते, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, शिवसेनेसारख्या पक्षाचे नेतृत्व आणि काँग्रेस नेतृत्वातील फरकाची भेदक जाणीव नारायण राणे यांना लवकरच झाली. काँग्रेसचे श्रेष्ठी हे प्रत्येक राज्यात आघाडीच्या नेत्यांना कायम झुंजत ठेवत असतात. विशेष करून पक्षाकडे त्या राज्यातील सत्ता असल्यास तेथील मुख्यमंत्र्याला कायम अस्वस्थ ठेवण्यात येत असते. काँग्रेसच्या या पॅटर्नमध्ये नारायण राणे यांनी काही वर्षे मुख्य भूमिका पार पाडली. मात्र, श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे ते संतप्त झाले. मध्यंतरी त्यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी झाला नाही. यातच त्यांनी आता काँग्रेस त्यागाची घोषणा केली आहे. मुळातच नारायण राणे यांची मुख्य राजकीय कारकीर्द ही मुंबईत बहरली असली तरी त्यांनी कोकणातील आपल्या बालेकिल्ल्याकडे जराही दुर्लक्ष केलेले नाही. यामुळे कोकणात आधी शिवसेना तर आता काँग्रेसचे बहुतांश सत्तास्थानांवर वर्चस्व आहे. अर्थात येथे पक्ष नावालाच असून हे सर्व जण राणे यांचे समर्थक आहेत. राणे गेल्यानंतर शिवसेनेला कोकणात जोरदार धक्का बसेल, असे मानले जात होते. मात्र, काही वर्षातच शिवसेनेने हा आघात सहन करत परत बर्‍यापैकी ताकद मिळवली आहे, तर राज्यात जोरदार मुसंडी मारणार्‍या भाजपला कोकणात मात्र स्थान निर्माण करता आलेले नाही. नेमकी हीच बाब हेरून भाजपने नारायण राणे यांना गळाशी लावल्याची होणारी चर्चा तशी अनाठायी नाहीच. खरं तर ते भाजपमध्ये गेल्यास ही बाब दोन्ही बाजूंना लाभदायकच ठरू शकते. त्यांच्या माध्यमातून भाजपला कोकणात प्रवेश मिळणार असून याचा थेट आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

दुसरी बाब म्हणजे राणे हे अलीकडे विधानपरिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. आता त्यांनी विधानपरिषदेचा राजीनामा दिला असून कदाचित ते भाजपच्या तिकिटावर पुन्हा या सभागृहात दिसतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणे यांना मंत्रिमंडळात प्रवेश देणे भाजपला लाभदायक ठरू शकते. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बहुजन नेतृत्व हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने राज्यात नेतृत्वबदल करून फडणवीस यांना केंद्रात प्रमोट केले जाईल, असे मानले जात होते. मात्र, हे करत असताना मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन आहे असे दर्शवण्याची तयारी भाजप नेतृत्वाने सुरू केली आहे. यात राणे यांचे मंत्रिपद पक्षाला उपकारक ठरू शकते. या माध्यमातून फडणवीस हे भाजपमधील बहुजनवादाला वारंवार अधोरेखित करणार्‍या एकनाथराव खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यासारख्या मातब्बरांना शहदेखील देऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाबाबत जनतेसमोर जाण्यासाठी पक्षाला अजून एक विश्‍वासार्ह चेहरा मिळणार आहे. म्हणजे राणेंची एन्ट्री ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी सोईस्कर बाब ठरणार आहे. मात्र, येथे पुन्हा नारायण राणे यांच्यासमोर शिवसेनेचा त्याग करताना उपस्थित झालेला प्रश्‍न उरतोच. तो म्हणजे- राणे हे भाजप संस्कृतीत पूर्णपणे मुरणार काय? नारायण राणे यांचा पिंड शिवसैनिकाचा आहे. याच प्रकारे भाजपमध्येही बर्‍याच प्रमाणात आता काँग्रेसप्रमाणेच केंद्रीय नेतृत्वाच्या हाती निर्णयक्षमता एकवटली आहे. यामुळे भाजपचा पूर्ण स्वीकार करण्याचे आव्हान, ते कसे पेलणार यावर बर्‍याच बाबी अवलंबून आहेत. आता ते राज्यभरात दौरा काढून नवरात्रीच्या अखेरीस आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यातील प्रमुख औत्सुक्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत कोण जाणार? हीच होय. ते स्वतंत्र वाट चोखाळून भाजपची सोबत करणार की थेट या पक्षात जाणार? हा प्रश्‍नदेखील आहेच. अर्थात याची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला काही दिवसांची वाट पाहणे क्रमप्राप्त आहे.