नारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांतदादा पाटील
पुणे : भारतीय जनता पक्षात प्रवेश करून प्रस्तावित राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रिमंडळात स्थान मिळेल, या शक्यतेने काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र डागत काँग्रेस सोडणारे नारायण राणे यांच्यासमोर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे प्राकर्षाने दिसून येत आहे. राणे हे भाजपच्या संपर्कात नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. तसेच, राणेंसाठी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद सोडू, असे आपण कधीच बोललो नाही, अशी कोलांटउडीही पाटील यांनी यावेळी मारली. त्यामुळे राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस सोडलेले राणे नेमके कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडला आहे.
हे देखील वाचा
चंद्रकांतदादांचे सरळ सरळ कानावर हात!
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारण्यात आले असता, त्यांनी याप्रकरणी सरळ सरळ कानावर हातच ठेवले. पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले, राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत अद्याप तरी काहीच चर्चा झालेली नाही. समजा त्यांना भाजपात घ्यायचे असेलच तर त्याबाबतचा निर्णय आपण नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हेच घेतील. तथापि, आपल्या माहितीनुसार, अद्याप तरी राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत काहीच ठरलेले नाही. पाटील यांच्या या विधानामुळे राणेंच्या भाजपप्रवेशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणे यांनी काँग्रेस तर सोडली आणि भाजपही त्यांना पक्षात घ्यायला तयार नाही, असे चित्र असेल तर राणे हे मध्यंतरीच लटकले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
राणेंकडूनही पक्षप्रवेशाबाबत सस्पेन्स
राणे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. तर दसर्यानंतर भावी वाटचालीची घोषणा करू, असे सांगत खुद्द राणे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. दुसरीकडे, भाजपातील कोणताही नेता राणेंच्या संपर्कात नाही, असे सांगून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यात आणखीच भर घातली आहे. राणेंसाठी आपण मंत्रिपद सोडू, असे आपण कधीही म्हणालो नाही, असे सांगून पाटील यांनी आणखी राजकीय गोंधळ निर्माण केला. कारण, ऑगस्टमध्ये सावंतवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील यांनीच राणेंचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे सांगितले होते. तसेच, पक्षासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्याग करण्यास तयार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले होते. काँग्रेसने सहा महिन्यांत मुख्यमंत्रिपद देऊ असे आश्वासन देऊन राणे यांना पक्षात घेतले होते. परंतु, कधीच त्यांना मुख्यमंत्री बनविले नाही. त्यातच आता भाजपदेखील राणेंना काय आश्वासने देतो व ती पाळतो की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे.