अहमदनगर । काँग्रेस नेते नारायण राणे यांनी संघर्षयात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलें आहे. विखे पाटील यांनी शिर्डीत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. नारायण राणेंचें संघर्ष यात्रेबाबत विधान वस्तुस्थितीच्या उलट असून संघर्ष यात्रेमुळेच मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा काढली आहे. राज्य सरकारवर दबाव वाढत असून अनेक घोषणा सरकार आज करते आहे, हे संघर्ष यात्रेचच फलीत आहे. राणे यांनी हे वास्तव समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
सरकारला इशारा
राज्य सरकार मुकबधीर असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकर्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नसून सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहेे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.शेतकर्यांचे सांत्वन होणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने कर्जमाफी करावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. समृद्धी महामार्ग मूठभर अधिकार्यांसाठी असून यातून शेतकर्यांची समृद्धी होणार नाही. बंदुकीचा व कायद्याचा धाक दाखवून सरकार काम करणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा विखे पाटलांनी सरकारला दिला.
राणेंची भूमिका
राज्यातील सामान्य जनतेच्या अपेक्षा व राजकीय परिस्थितीवर भाष्य करुन राणे बर्याचदा राज्यातील काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्याचा व काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. या मुद्याचे आकलन झालेल्या सल्लागारांनी सल्ला दिल्या नंतर आज विखे पाटलांनी हे विधान केल्याचे समजले जाते.