मुंबई । माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावले. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर चर्चेचा विषय बनले आहे. या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आले आहे. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे, भाषा वादग्रस्त आहे. राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेने प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण आता पोस्टर लावून शिवसेनेने राणेंच्या विरोधात आवाज उठवलेला पाहायला मिळतो आहे. राणेंचा भाजप प्रवेश नक्की झाल्यास हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची पोस्टरबाजी
’इच्छा माझी पुरी करा’ अशा शिर्षकाखाली लावलेल्या या पोस्टरमध्ये नारायण राणे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा देखील वादग्रस्त आहे. नारायण राणे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही अशी शपथ अरविंद भोसले यांनी घेतली होती. त्यानंतर राणेंचा पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी पायात चपला घातल्या. मात्र आता पुन्हा राणेंच्या विरोधात बॅनरबाजी करून भोसले चर्चेत आले आहेत.
निलेश राणे ट्विटरवर आक्रमक
शिवसेनेच्या या बॅनरबाजीवर राणेंचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसेनेला त्यांच्या खास शैलीत ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. मुंबई भर आता बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार अशा आषयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता या पोस्टर वादावरून शिवसेना विरूद्ध राणे असा सामना पाहायला मिळणार हे नक्की.