दर वर्षी दि. 1 जुलै हा दिवस ‘डॉक्टर डे’ म्हणून साजरा होतो. या वर्षीदेखील याला मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र गत एक वर्षातील घटनांचा मागोवा घेतला असता, डॉक्टरांच्या आजच्या सामाजिक स्थिती व स्थान याविषयी गांभिर्याने चिंतन करणे जरुरी असल्याचे दिसून येते.. डॉक्टरांच्या विविध विषयांसाठी इंडियन मेडिकल असोशिएशन ही संघटना काम करीत आहे. याच संघटनेच्या नेतृत्वात दि. 6 जूनला दिल्लीत 30 हजारावर डॉक्टर्स गोळा झाले. त्यांनी त्यांच्या अपेक्षा केंद्र सरकारसमोर व्यक्त केल्या. यात मुख्य मागणी ही डॉक्टरांवर रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून होणार्या हल्ल्यांपासून कायदेशीर संरक्षण ही आहे. यासाठी दि. 18 ऑगस्टपर्यंतचा वेळ सरकारला दिला आहे. तोपर्यंत सकारात्मक काही घडले नाही तर दि. 18 ऑगस्टपासून देशातील डॉक्टर बेमुदत संपावर जातील. डॉक्टरांचा हा लढा एक प्रकारे डॉक्टरांशी युध्द करणार्या प्रवृत्ती विरोधात आहे. भारतीय संस्कृतित देवादिकांची संख्या 33 कोटी असल्याचे म्हटले जाते. या देवादिकांमध्ये धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता सुद्धा आहे. भारतीयांच्या पारंपरिक ग्रंथात आरोग्य चिकित्सेशी संबंधित आयुर्वेद हा अती प्राचिन ग्रंथही आहे. त्यामुळे भारतीय समाजात वैद्यकिय सेवा देणार्या व्यक्तिस देव मानले जाण्याची परंपरा वर्षानुवर्षे आदराने पाळली गेली. अगदी अलिकडच्या 10-15 वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही आदरास पात्र होती. मात्र, वैद्यकिय सेवा जशी जशी प्रगत होत जावून मानवी कौशल्यासह त्यात आधुनिक यंत्र व तंत्राचा वापर वाढला आणि त्या त्या क्रमाने वैद्यकिय सेवा ही वैद्यकिय व्यवसायात परावर्तीत झाली. काळाच्या ओघात आणि महाग झालेल्या यंत्र व तंत्रामुळे असे होणे नैसर्गिक व क्रमप्राप्त आहे. अगदी अलिकडे आरोग्याशी संबंधित तपासणी, शल्यचिकित्सा व औषध योजना आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या सोयी-सुविधांमुळे वैद्यकिय सेवा हा उद्योग झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना आजारातून हमखास बरे होण्याची व दीर्घ काळ जगण्याची शाश्वती देण्यासाठी वैद्यकिय सेवांचे असे औद्योगिकीकरण होणे आवश्यक आहे. हा सर्व बदल घडत असताना वैद्यकिय सेवा देणार्या व्यक्तिंच्या विषयी मात्र समाजमन पूर्णतः बदलले आहे. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते व्यावसायिक व व्यावहारिक पातळीवर आल्यामुळे त्यात प्रत्येक रुग्ण जगलाच पाहिजे अशी सक्ती निर्माण व्हायला लागली आहे.
वैद्यकिय सेवा आणि कौशल्यांचा कितीही विकास झाला तरी डॉक्टर मंडळी प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवू शकतीलच असे हमखासपणे कोणीही सांगू शकत नाही. डॉक्टरांच्या हाताला यश आणि अपयश असे दोन्ही निष्कर्ष संभावित मानले पाहिजेत. पण तसे होताना दिसत नाही. वैद्यकिय सेवा-सुविधा प्रगत होत असताना त्यातील जोखीमीच्या जागा वाढत आहेत. सुविधा जेवढ्या जीवदायी तेवढ्या त्या महागड्या होत आहेत. तरी हा प्रकार केवळ भारतातच नाही तर तो जगभरात तसाच महागडा आहे. इतर देशांमध्ये वैद्यकिय सेवा विमा योजनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. मात्र, भारतात अजुनही वैद्यकिय सेवा विमा योजनांविषयी लोक उदासिन दिसतात. भारतात आजही सरकार अनुदानित योजनांवर फार मोठ्या घटकांसाठीची आरोग्य सेवा अवलंबित आहे. मोफत, अनुदानित, सवलतीत अशा अनेक कारणांमुळे सर्व सामान्य लोकांना सरकारी सेवा मिळत असल्याने खासगी स्वरुपातील वैद्यकिय सेवा मात्र महागडी वाटू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून डॉक्टर व रुग्णासोबत त्याचे नातेवाईक तथा हितचिंतक यांच्यात अविश्वासाची दरी वाढताना अनुभवाला येत आहे. डॉक्टर होणारी मंडळी मानवी शरीराच्या बारकाव्यांचे शिक्षण घेवू लागली, त्याला येणारा खर्च करु लागली, त्यासाठी आयुष्याचा काही काळ खर्ची घालू लागली, सेवा-सुविधांसाठी गुंतवणूक करु लागली त्याचवेळी दुसरीकडे आरोग्य सेवांच्या महागड्या होण्याबरोबरच वैद्यकिय सेवांमधील हलगर्जी व दुर्लक्षितपणा विषयी तक्रारीही वाढू लागल्या. वैद्यकिय सेवांमधील नफा-नुकसान याचा ताळमेळ घालण्यासाठी काही व्यावहारिक व्यवस्थापनही खासगी वैद्यकिय सेवा-सुविधांमध्ये निर्माण झाले आहे. याच पद्धतीतून रुग्ण आणि डॉक्टरांच्या सेवांविषयी रोष निर्माण होण्याची कारणेही वाढत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात आज डॉक्टर आणि रुग्णांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यासारखे दिसत आहे. ही बाब गंभीर आहे. वैद्यकिय सेवांमधील गैर किंवा अप प्रवृत्तींना रोखण्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण कायद्यांतर्गत वैद्यकिय सेवा आणली गेली, डॉक्टरांच्या वैद्यकिय सेवांसाठी विविध प्रकारचे परवाने व नियंत्रण लादले गेले. मात्र, यातून डॉक्टरांविषयी सामाजिक आदराचे भान निर्माण होण्याच्या ऐवजी डॉक्टर विषयी चोरांसारखा अनादराचा भाव निर्माण होत आहे. हेच खरे धोकादायक आहे. डॉक्टरांविषयी सामाजिक अनादराचा हा धोका केवळ सध्याच्याच डॉक्टरांच्या पिढीला नाही तर सध्या जे वैद्यकिय सेवा देण्याचे काम करीत आहेत त्यांची भावी पिढीही अशा प्रकारच्या धोकादायक आयुष्याला कंटाळून वैद्यकिय सेवेत काम करण्यास तयार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे, कोणताही रुग्ण उपचार सुरू असताना दगावला तर उपचार करणार्या डॉक्टर व त्याच्या सहकार्यांच्या सुरक्षिततेची हमी आज समाजातील कोणताही घटक देवू शकत नाही. अगदी पोलीस ही यंत्रणा सुद्धा डॉक्टरांना हमी पूर्ण संरक्षण देवू शकत नाही. संरक्षण यंत्रणांमधील हाच दुबळेपणा लक्षात घेवून वैद्यकिय सेवा देणार्यांनी एकत्र येवून डॉक्टर हल्ला विरोधी कायदा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून रेटून धरली आहे. खरे तर असे कायदे करुन प्रश्न मिटत नाही. सरकारी यंत्रणेच्या काही घटकांवरही हल्ले होतात, पत्रकारांवर हल्ले होतात. मात्र, प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे हल्ला विरोधी कायद्याची मागणी करायला लागली तर घटनापिठातील प्रकरणांची संख्या शेकड्यात जाईल. हे जरी सत्य असले तरी वैद्यकिय सेवा देणार्यांच्या संघटनात्मक यंत्रणांना स्वतंत्र काद्याची मागणी करण्यावाचून पर्याय राहत नाही. आज डॉक्टरांना मारहाण विरोधी कायदा करण्याचे सरकारने मान्य केले असले तरी भविष्य काळात खासगी वैद्यकिय सेवांमध्ये निर्माण होणारी मनुष्यबळाची कमतरता अनेक समस्या घेवून उभी आहे. वैद्यकिय सेवेत असलेल्या लोकांची दुसरी-तिसरी पिढी आता इतर उद्योग व्यवसायांकडे वळते आहे. कोणाच्याही रोषामुळे होणारी मारहाण टाळण्यासाठी वैद्यकिय सेवेतील भावी गुणवत्ता स्थानांतरित होत आहे. येणार्या काही वर्षांत खासगी वैद्यकिय सेवा कमी झाल्या तर त्या विषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दुसरीकडे सरकारी आरोग्यसेवांसाठी इमारती, यंत्रणा व निधी आहे. पण, तेथे काम करण्यासाठी कौशल्याधारित मनुष्यळ नाही. म्हणजेच खासगी सेवा बंद होत आहे, सरकारी सेवेची शाश्वती नाही. अशावेळी मोठमोठ्या व अधिक महागड्या वाटणार्या सुपर, मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलची संख्या वाढणार आहे. तेथे आरोग्यसेवा मिळण्याचे व्यावहारिक गणित अधिकच कठीण होणार आहे.
भविष्यात वैद्यकिय सेवा ही एक तर दुर्बल घटकातील रुग्णांना सरकारी अनुदानित स्वरुपात मिळू शकेल किंवा ती दानधर्माच्या माध्यमातून मोफत असेल. अती श्रीमंत वर्ग मोडीक्लेम अथवा विमा साहाय्यता योजनांचा लाभ घेवून आरोग्यसेवा घेईल. यात सर्वाधिक अडचण ती मध्यमवर्गीय गटातील रुग्णांची होणार आहे. त्यांच्यासाठी आज आहे ती सेवा आकुंचित होवून अधिक महागडी सेवा निर्माण होण्याची भीती जास्त आहे. वैद्यकिय सेवा सध्या तीन प्रकारात विभागली आहे. पहिला प्रकार म्हणजे अती प्रगत तंत्राचा. हे तंत्र आजही पाश्चात्य यंत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे ते खर्चिक आहे. दुसरा प्रकार म्हणजे, सहानुभूती व भावभावनांचा. यात डॉक्टरांनी निष्ठा व प्रामाणिकपणे सेवा द्यावी अशी समाजाची अपेक्षा आहे. या भाव-भावनांची सांगड कौशल्य, यंत्र-तंत्र व त्याचीशी निगडीत खर्चाशी घातली जात नाही. त्यामुळे त्यातील फरक हा महागडी व अतीमहागडी असे परिणाम दर्शवतो. तिसरा प्रकार हा डॉक्टरांचे कौशल्य व परिणाम याच्याशी इतर व्यावसायिक कौशल्यांची तुलना करणारा आहे. ज्याप्रमाणे ग्राहक कायद्याने डॉक्टरांना कुशल कामगार ठरवून टाकले त्याच प्रमाणे इंजिनिअर, वकिल, व्यावसायिक आदींच्या रांगेत आणून बसवले. भारतीय समाजाची एक गंमत आहे. ती म्हणजे कायदा हा डॉक्टरांना इतर मानवी कौशल्यांच्या बरोबरीने समजतो. मात्र, इतर व्यवसायात जसे सामुहिक जबाबदारीने अपयश पचवले जाते तसे डॉक्टरांच्या अपयशाबाबत होत नाही. अगदी छोटा मुद्दा असा की, एखादा वकील न्यायालयात खटला हरला तरी त्याच्यावर हल्ला होत नाही. एखाद्या अभियंत्याने बांधलेला पूल पडला तरी त्याच्यावर कोणीही हल्ला करीत नाही. दुसरीकडे मात्र एखादा रुग्ण कोणत्याही कारणामुळे दगावला तरी रुग्णाच्या नातेवाईक व इतरांच्या रोषाला डॉक्टरांना सामोरे जावून मारहाण सहन करावी लागते. भारतात डॉक्टरांशी युद्ध या पद्धतीने सुरू आहे. आज वैद्यकिय सेवा किंवा व्यवसाय हा इतर सेवा, उद्योग आणि व्यवसाय यांच्या बरोबरीचा झाला आहे. डॉक्टरांनाही वेगवेगळ्या प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. अनेक प्रकारचे पठाणी कर भरावे लागतात. कोणताही यंत्रणा उभी केली की त्याच्याशी संबंधित मनुष्यबळाचा आणि यंत्रणेच्या देखभालचा खर्च करावा लागतो.
या गोष्टी बहुतांश डॉक्टरांना काही काळ परवडणार्या नसतात. मात्र, भविष्य काळात स्थिती सुसह्य होईल असे गृहित धरुन आजही अनेक डॉक्टर वैद्यकिय सेवा देण्यासाठी टीकून आहेत. पण, हे फार काळ चालणार नाही. गुंतवणूक, खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण जसे जसे व्यस्त होत आहे तस तसा वैद्यकिय सेवा व्यवसाय आकुंचित होतो आहे. कमी होतो आहे. हे सत्य भारतीय समाजमनाने स्वीकारायला हवे. या सर्व व्यवहारात डॉक्टरांच्या शारिरीक व मानसिक त्रासाविषयी फारशी गांभिर्यांने चर्चा होत नाही. वैद्यकिय सेवा किंवा व्यवसाय हा आता 24 तासांचा झालेला आहे. सेवा उपलब्ध नाही, असे कोणताही डॉक्टर म्हणू शकत नाही. त्यामुळे कामांच्या तासाची सुटसुटीत विभागणी करताना कुशल मनुष्यबळ वाढविण्याची सतत गरज निर्माण होत आहे. परंतु वास्तव काय आहे तर, भावी पिढी वैद्यकिय सेवा व्यवसायात यायला तयार नाही. त्यांना वैद्यकिय सेवा व्यवसायातील ताण-तणाव-संघर्ष व प्रतिक्षेचा काळ नको आहे. डॉक्टरसाठी आवश्यक असलेली बौद्धिक गुणवत्ता इतर व्यवसाय-उद्योगात लावून विनाचिंतेचे व अधिक आरामाचे आयुष्य जगण्याचे पर्याय नवी पिढी स्वीकारत आहे. खरा धोका आहे तो हाच. भारतात डॉक्टरांशी खेळले जाणारे युद्ध वेळीच रोखले नाही गेले तर देशांतर्गत समाजव्यवस्था ढासळून मानवी व्यवस्थेचा असा पराभव होईल की, त्यातून सावरणे पुढील शंभर वर्षे शक्य होणार नाही.
डॉ.राजेश पाटील
आयएमए जिल्हाध्यक्ष
-मो. 9588580070