भुसावळ : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या देशभरातील शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा भुसावळने मुसंडी मारली आहे. 382 शहरांमध्ये 128 व्या क्रमांकावर असलेले शहराचे रॅकींग आता पहिल्या 100 शहरांच्या पंक्तीत बसले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहराने सहा हजार पैकी 4144.75 गुण मिळवून 98 रॅकींग मिळवले आहे. रात्रीची स्वच्छता, घंटागाडीने कचरा संकलन, संकलीत कचर्याचे विलगीकरण करुन सेंद्रीय खत निर्मिती, हागणदारी मुक्तीसाठी व्यापक प्रयत्न यामुळे शहराचे मानांकन यंदा वाढले आहे. तर पुढील वर्षी पालिकेने टॉप टेनमध्ये येण्याचा मानस ठेवला आहे.
यंदा कामगिरी समाधानकारक
स्वच्छ सर्वेक्षणातील ओडी फ्री, घनकचरा व्यवस्थापन, बायोमायनींग, नागरिकांचा प्रतिसाद, सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमधील विविध निकषांचे डाक्युमेंटेशन आदींच्या निकषांवर ही स्पर्धा होते. देशभरातील अमॄत योजनेत समाविष्ठ असलेल्या 1 ते 3 लाख लोकसंख्येच्या 382 शहरांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात यंदा भुसावळची कामगिरी समाधानकारक राहिली आहे.
भुसावळाला मिळाले 4144 गुण
विविध निकषांसाठी सहा हजार गुण होते, यापैकी शहराला 4144. 75 गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी ते केवळ 2986.39 होते. शहराला यंदा नाईट स्विपींग (रात्रीची स्वच्छता), हागणदारीमुक्ती, कचरा संकलन व प्रक्रिया या निकषांचे गुण वाढले आहेत. शहरातून दररोज निघणार्या किमान 70 मेट्रीक टन कचर्यावर दररोज प्रक्रिया केली जाते. यासोबतच नालेसफाई, शहरातील प्रमुख मार्गावरील भिंती, बोगद्यांमध्ये रंगेबेरंगी चित्रांच्या माध्यमातून प्रबोधन, शौचालयांची स्वच्छता, नवीन शौचालयांची निर्मिती आदी उपाययोजना केल्या जात असल्याने आगामी वर्षी टॉप 10 गुणानुक्रम मिळविण्यासाठीची आशा आहे.
राज्यात 19 वा क्रमांक
देशभरात 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमृत योजनेत 382 श्हरांचा समावेश आहे. यापैकी राज्यात 34 शहरांचा समावेश आहे. राज्यातील 34 शहरांपैकी भुसावळला 19 व्या क्रमांकाची रॅक मिळाली आहे. यापूर्वी राज्याच्या रँकमध्येही शहर पिछाडीवर होते.
100 टक्के कचर्याची उचल
शहरात यापूर्वी दररोज निघणारा कचरा उचलला जात नव्हता. जानेवारी महिन्यापासून दररोज 100 टक्के अर्थात सुमारे 70 टन कचरा उचलला जातो. या कचर्यावर प्रक्रिया होते. यामुळे शहर कचरामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. पालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढवली तर अजून सुधारणा होईल.
अशी राहिली पाच वर्षांची कामगिरी
2017 — 433
2018 — 69 (फास्टेट मुव्हर्स पुरस्कार)
2019 —- 132
2020 — 69
2021 — 128
2022 —- 98
कचरा विलगीकरण घरुनच व्हावे
पालिका प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. यातून सेंद्रीय खतांची निर्मिती होते. शहरातील गुणानुक्रम वाढविण्यासाठी आता घरातून निघणारा कचरा विलगीकरण करुन मिळावा, यासाठी प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी घरातच दोन डस्टबीन ठेवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करुन द्यावा. शहराचे मानांकन वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छ सर्वेक्षणाचे समन्वयक नितीन लुंगे यांनी केले आहे.