रात्रीतून 5 दुकाने फोडून व्यावसायिकांच्या साधनांची चोरी

0

साक्री। शहरात एकाच रात्रीतून 5 दुकाने फोडून व्यावसायिकांच्या हजारो रुपयांच्या कपडे व व्यवसाय साधनांची चोरी करण्यात आली असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कुलूपे तोडण्यात आली आहेत. एकाच रात्रीतून झालेल्या या घटनेमुळे साक्री शहरात व्यापारी व व्यावसायिकांमध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावरील दूध डेअरीच्या गेटलगत असलेले किशोर अ‍ॅटो गॅरेज, कन्हैय्यालाल इंजि. वर्क्स, मनोज अ‍ॅटो गॅरेज व भावना मेन्स पार्लर, तसेच शहरातील पोलिस स्टेशन व पोलिस अधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोरील शेतकी संघातील व्यापारी संकुलातील नितीन टेलर्स यांची दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, हजारो रुपयांची व्यावसायिक साधने व नितीन टेलर यांच्या दुकानातील ग्राहकांचे नवे कपडे चोरुन नेले.

साक्री पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान
या घटनेमुळे साक्री पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हानच उभे केले आहे. शहरात गस्ती पथकाने या ठिकाणांवरुन गस्त घालून गेल्यानंतर सदर प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले जात आहे. शहरात रात्री -अपरात्री फिरणार्‍यांची संख्या वाढली असून त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नसल्यामुळे तसेच रात्री बेरात्री महामार्गावर अपरिचित मोटरसायकलस्वारांची संख्या वाढली असून यामुळेच अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतकी संघाच्या व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमणामुळेच या परिसरात चोरट्यांना लपायला जागा मिळते व बिनधास्तपणे चोरी करता येते, असेही येथील व्यावसायिकांमध्ये बोलले जात आहे. या अतिक्रमण धारकांना न्यायालयाने आदेश देवूनही तसेच शेतकीसंघाने पर्यायी गाळे उपलब्ध करुन दिल्यावरही त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली होत असल्याचीही तक्रार येथील व्यावसायिक करीत आहेत.