‘रात गयी, बात गयी’; खडसेंबद्दल चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया

0

पुणे: भाजपमध्ये ४० वर्षापासून असलेले एकनाथराव खडसे यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांनी भाजप सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलणे टाळले आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला ‘रात गयी, बात गयी’ एवढीच प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज शनिवारी २४ रोजी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अटल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी माध्यमांनी त्यांना खडसे यांच्याबाबत प्रश्न केले असता त्यांनी अधिक बोलणे टाळले.

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याच्या भाषणात बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपने माझ्यावर अन्याय केल्याचे आरोप करत जळगावसह उत्तर महाराष्ट्रात माझी ताकद दाखवून देईन, असा इशाराही दिला होता.