राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे पपेट

0

पुणे: काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद बेकायदेशीरपणे स्वत:कडे घेतले असून, सर्व संस्था बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी येथे केला. राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षाचे पपेट, असल्याचा सणसणाटी आरोपही अशोक विखे यांनी केला.

ज्येष्ठ नेते बालासाहेब विखे यांच्या निधनानंतर अल्पावधीतच विखे कुटुंबात फूट पडल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. अशोक विखे यांनी बुधवारी अचानकच पत्रकार परिषद घेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तोफ डागल्याने खळबळ उडाली आहे.

प्रवरा मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. ईडीच्या एका अधिकार्‍याकडून ही माहिती आपल्याला समजल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब विखे यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वता:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे व राजेंद्र विखे करत असल्याचा आरोपही अशोक विखे – पाटील यांनी केला.

सत्तेचा गैरवापर केला
बाळासाहेब विखे पाटील यांनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी माझ्याकडे प्रवरा शिक्षण संस्थेची जबाबादारी दिली होती. त्यासाठी घटनेत बदलही करण्यात आला होता. त्या बदलाबाबतचा निर्णय धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या ओळखीचा फायदा करून घेत संस्था बळकावली. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ही याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी घेतली आहे. त्यामुळे मी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे, असे अशोक विखे पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपद ही बक्षिसी
केंद्रात वाजपेयी सरकार सत्तेवर असताा 2001 मध्ये माधवपूर मर्कंटाईल बँकेचे प्रकरण गाजले होते. त्या प्रकरणात बाळासाहेब विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांना वाचवले होते. त्याचे बक्षीस म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे, असा दावाही अशोक विखे पाटील यांनी केला. राज्यात गेल्या दोन वर्षांत हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. परंतु, विरोधी पक्षनेत्यांना शेतकर्‍यांचा कोणताच प्रश्‍न प्रभावीपणे मांडता आला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या निराशाजनक कामगिरीबाबत बाळासाहेब विखे पाटील शेवटच्या काळात खूप निराश झाले होते, असा दावाही अशोक विखे पाटील यांनी केला.