मुंबई । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारागणगावकर जीवनगौरव पुरस्कार राधाबाई खोडे- नाशिककर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वाशी येथे मार्च रोजी आयोजित केलेल्या एका शानदार सभारंभात राधाबाई खोडे-नाशिककर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
दरवर्षी राज्य शासनातर्फे लोककला क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणार्या कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारागणगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह असे आहे. सन 2015-16 यावर्षीचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारागणगावकर जीवनगौरव पुरस्कार राधाबाई खोडे- नाशिककर यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा आज सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा वाशी येथील सेक्टर 30 ए, सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.