जामन्यात रानडुकराने घेतला 16 वर्षीय मुलाचा बळी

0

पिता गंभीर जखमी : वनविभागाकडून जखमीवर तातडीने उपचार

यावल : जंगलातून पायी जाणार्‍या पिता-पूत्रांवर रानडुकरांनी हल्ला चढवल्याने मुलाचा मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सातपुडा जंगलातील जामन्यामध्ये रविवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या घटनेत राजू बारेला (16) याचा मृत्यू झाला असून सबासिंग रेदरा बारेला (45, जामुनझिरा पाडा) हे गंभीर जखमी झाले. जामन्या परीमंडळातील कक्ष क्रमांक 102 मधून जात असताना त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला.

घटनेनंतर वनविभागाची धाव
सातपुड्याच्या जंगलात असलेल्या जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर राहत असलेल्या सबासिंग रेदरा बारेला व त्यांचा मुलगा राजू सबासिंग बारेला हे दोघे पितापुत्र जामुनझिरा येथुन रविवारी दुपारी आंबा पाणी येथे जाण्या करीता सातपुड्याच्या जंगलातुन पायी निघाले होते. दरम्यान साडेबारा वाजेच्या सुमारास ते जामन्या परीमंडळामधील कक्ष क्रमांक 102 मधुन जात असतांना अचानक त्यांच्यावर रानडुकराने हल्ला चढवला या हल्यामध्ये राजू सबासिंग बारेला हा बालक जागीच ठार झाला तर आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात सबासिंग बारेला हे गंभीर जखमी झाले. याबाबत आरडाओरड व रानडुकराचा प्रतिकार केल्याने रानडुक्कराने तिथून पळ काढला. नागरीकांना या घटनेची माहिती वनविभागाला माहिती दिली असता यावल पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल असलम खान, वनपाल व्हि. के. बोराडे, वनरक्षक के.एस.गजरे, शालिक बारेला, दिलीप पावरा, गोविंदा पावरा हे पथकासह या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी दोघांना तत्काळ तेथून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणले येथे गंभीर जखमी सबासिंग बारेला याच्यावर डॉक्टर प्रल्हाद पवार, अधिपरीचारिका प्रियंका मगरे, पिंटू बागुल, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले व त्याला जबर पायाला दुखापत असल्याने पुढील उपचाराकरीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये हलविण्यात आले. मृत राजु बारेला याच्यावर रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मोहराळा पोलीस पाटील युवराज पाटील, लहू पाटील, सुपा तडवी, सलीम तडवी यांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सातपुड्याच्या वनराईत घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.