रानडुकराचा हल्ला; शेतमजूर गंभीर जखमी

0

मोताळा । मोताळा भागात रानडुकरांचा प्रश्‍न गंभीर बनल्याचे चित्र असून रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात घडली. शेलगाव बाजार येथील अरुण भगवान तांदूळकर (45) हे गुरुवारी गावातीलच गणेश खर्चे यांच्या शेतात काम करीत होते. दरम्यान अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाल्याने मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अरुण तांदुळकर यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेत रानडुकराच्या तावडीतून त्यांची सुटका केली. दरम्यान, रानडुकराने भरदिवसा हा हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजुर व नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

वन्य प्राण्यांचा वावर वाढला
सध्या खरीप पेरणीची लगबग सुरु असल्याने शेतकर्‍यांसह मजूरांचा शेतशिवारात राबता आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांनी गावाकडे मोर्चा वळविल्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मागील पंधरवड्यात मोताळा वन विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एस.टी. बसच्या धडकेत रोही ठार झाला. तर, गेल्या आठवड्यात एक रोही मोताळा शहरातील जिजाऊ नगरात भटकंती करताना आढळला होता. रानडुकरांसह वन्यप्राणी शेतीपिकांची नासाडी करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजुर व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.