रानमळ्याच्या जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे झाले कमी

0

कडूस । राष्ट्रपिता रानमळा येथील पहिल्या आय. एस. ओ. मानांकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओझ्याविना शाळा आणि ग्रंथालय शाळा दत्तक या योजनांचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

विकासाची मागणी
माजी जि. प. सदस्य पी. टी. शिंदे यांनी गावातील विविध विकासकामांबाबतच्या मागण्या प्रास्ताविकात मांडल्या तर ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी शिक्षण विस्तार अधिकारी जि. रं. शिंदे यांनी ग्रंथालय शाळा दत्तक योजना व ओझ्याविना शाळा या संकल्पनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी तनुजा घनवट, नंदा सुकाळे, गटशिक्षणाधिकारी सोपान वेताळ, डॉ. राजेश बनकर, सतिश राक्षे आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलास मुसळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

शिक्षकांचा सत्कार
शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापिका शारदा गाडे, राजेंद्र शिंदे, तृष्णा घुमटकर, प्रिया देवरे, वंदना शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुस्तके, रोपे व रोख बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या सर्व कामांची वेळेत आणि दर्जेदार पुर्तता केल्याबद्दल बांधकाम व्यवसायिक एम. बी. थिटे यांचा व या कामात स्वेच्छेने मदत करणारे होनाजी शिंदे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

वर्गात दप्तरे ठेवण्याची व्यवस्था
अलका यादवराव शिंदे एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून या शाळेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची दप्तरे ठेवण्यासाठी लोखंडी रॅक बनवून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दप्तरांचे ओझे ने-आण करण्याची गरज भासणार नाही. आवश्यक तेवढीच वह्या-पुस्तके विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतात. यामुळे रोज शाळेत ये-जा करताना दप्तराचे ओझे बाळगावे लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील दप्तराचा भार कमी होणार आहे.

गावात सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन
कै. वामनराव मारुती शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय शाळा दत्तक योजनेतून ही शाळा दत्तक घेण्यात आली. शाळेच्या विविध भौतिक सोयीसुविधांकडे ग्रामस्थांनी विशेष लक्ष पुरवल्याबद्दल आणि या अभिनव योजनेची सुरुवात केल्याबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावात विशेष लक्ष पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.