नवी दिल्ली : स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारामार्फत देशाचे ३० हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबानींच्या खिशात घातले आहेत. मोदी हे देशाचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘संपूर्ण देश राफेल कराराबाबत बोलत असताना पंतप्रधानांनी मौन बाळगले आहे. दुसरीकडे संरक्षणमंत्री देशात काहीतरी आणीबाणी उद्भवल्याप्रमाणे स्वत: फ्रान्सला जातात. ४५ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेले उद्योगपती अनिल अंबानी दहा दिवसात डिफेन्स कंपनी उघडतात आणि या कंपनीला ३० हजार कोटी रुपये या करारामार्फत देण्याची पंतप्रधान तजवीज करतात, हे सर्व फार गंभीर आहे. पंतप्रधान भ्रष्ट आहेत. त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा. अन्यथा या भ्रष्टाचारासाठी पदाचा राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.