राफेल खरेदीच्या माध्यमातून सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक – राहुल गांधी

0

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राफेल खरेदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. राहुल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर निशाना साधला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांनी मिळून सुरक्षा दलावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. मोदीजी तुम्ही देशाचा विश्वासघात केला आहे. तुम्ही आमच्या सैनिकांच्या रक्ताचा अपमान केला आहे’, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे या ट्विटवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.